टास्क फोर्सचे निरीक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्यूत मागील काही दिवसांत वाढ होते आहे. त्याचप्रमाणे, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील मुंबईतील मृत्यूंचे विश्लेषण केले असता ४५ वयोगटाच्या आतील रुग्णांच्या मृत्यूत १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी नाेंदवले. तसेच, येत्या आठवड्यात मुंबईतील दैनंदिन मृत्यूत आणखी वाढ होणार असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
याविषयी, मृत्यू विश्लेषण टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, मागील काही दिवसांत गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची स्थिती सातव्या किंवा आठव्या दिवशी अचानक खालावल्याने मृत्यूत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. हृदयविकार किंवा स्ट्रोक ही मृत्यूची कारणे असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत मुंबईतील रुग्णसंख्येत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईत मृत्यूदर मागील आठवड्यात ०.३५ टक्के होता, त्याआधीच्या आठवड्यात ०.२३ टक्के होता. सध्या दैनंदिन मृत्यूंचे प्रमाण ५०-६० वर आहे, मात्र येत्या काही दिवसांत हे प्रमाण १०० वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजूनही कोरोनाबाबत बेफिकिरी बाळगणाऱ्या नागरिकांनी आता तरी मास्कचा वापर, स्वच्छता आणि शारीरिक अंतर राखण्याचे नियम काटेकोरपणे पाळायला हवेत.
* याेग्य वेळी रुग्णालयात दाखल हाेणे गरजेचे!
सहव्याधी असणाऱ्या रुग्णांचा मृत्यू ओढावत आहे. तसेच, उशिराने निदान व विलगीकरणात त्रास झाल्यानंतर योग्य वेळी रुग्णालयात दाखल न होणे ही सुद्धा मृत्यूमागील काही कारणे आहेत, अशी माहिती नेस्को कोविड केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्राडे यांनी दिली. तर पालिका व खासगी रुग्णालय व्यवस्थापनात समन्वयक म्हणून भूमिका बजावणाऱ्या डॉ. गौतम भन्साळी यांनी मुंबईतही खाट उपलब्ध न झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली नसल्याचे सांगितले.