एक मराठा, लाख मराठाच्या घोषणांचा गजर; आता लढाईला सुरुवात झाली असल्याची भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:31 AM2018-11-30T00:31:32+5:302018-11-30T00:31:55+5:30
समन्वयकांचा निर्धार : जल्लोषाऐवजी मृतांना वाहिली श्रद्धांजली, आरक्षणानंतरही मोर्चाने शिस्त पाळली
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयावर दोन्ही सभागृहांत गुरुवारी शिक्कामोर्तब झाल्यानंतर श्रेयवादावरून सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. मात्र पहिल्या विराट मोर्चापासून शिस्त पाळणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी आरक्षणानंतरही मोर्चाची शिस्त पाळली. आरक्षणाचा जल्लोष करण्याऐवजी आरक्षणाच्या लढाईत मृत पावलेल्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहून क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांनी मोर्चाची शिस्त पाळली. आरक्षण मिळाले असले, तरी इतर मागण्या पाहता ‘आत्ता कुठे लढाईला सुरुवात झाली आहे,’ असा निर्धारही कार्यकर्त्यांनी या वेळी केला.
मराठा आरक्षणासाठी दोन आठवड्यांहून अधिक वेळ उपोषण करणाºया मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सोमवारपासून संवाद यात्रेचे रूपांतर ठिय्यात करणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी गुरुवारी मोर्चाची शिस्त पाळली. सकाळपासून दोन्ही आंदोलनांत शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. मराठा आरक्षणाचा कृती अहवाल मांडून विधेयकाला मंजुरी मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती आंदोलकांना होती. त्याप्रमाणे फोनाफोनी करून आंदोलक विधान भवनात सुरू असलेल्या हालचालींचा आढावा घेताना दिसले. दुपारी १२च्या सुमारास कृती अहवाल विधानसभेत मांडण्याची बातमी येताच आझाद मैदान ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी दणाणले. काही समन्वयकांनी तत्काळ मंत्रालयाच्या दिशेने धाव घेत विधेयक मंजुरीची प्रतीक्षा करण्यास सांगितले. त्यानंतर कार्यकर्ते मोठ्या धीराने आरक्षणाची वाट पाहत होते.
काही वेळातच मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणाºया विधेयकाला मंजुरी मिळाल्याची बातमी मैदानात पसरली. तरीही आपली शिस्त न मोडता समन्वयकांच्या प्रतीक्षेत कार्यकर्ते होते. तितक्यात समन्वयक आरक्षणाच्या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यास परतले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा विविध घोषणा मैदानात घुमू लागल्या. मराठा कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधीही सुसाट सुटले होते. कार्यकर्त्यांच्या जल्लोषाचे फोटो घेण्यासाठी माध्यमे आतुर झाली होती. मात्र आंदोलनात ४० कार्यकर्त्यांचे बलिदान दिल्यानंतर आरक्षण मिळाल्याने जल्लोष करणार नसल्याचे सांगत मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाने पुन्हा एकदा शिस्तीचे दर्शन घडवले.
नेत्यांची रीघ लागली
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होताच आंदोलकांची भेट घेण्यासाठी राजकीय नेत्यांची रीघ लागली. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांपासून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आमदार भाई जगताप अशा विविध आमदारांचा समावेश होता.
मात्र राजकीय नेत्यांकडून आपली पाठ थोपटून घेण्याऐवजी कार्यकर्त्यांनी कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या, मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी द्या, आरक्षण आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, अशा मागण्या केल्या. तसेच ठोस आश्वासन दिल्याशिवाय नेत्यांना बाहेर पडू देणार नसल्याचा इशाराही काही कार्यकर्त्यांनी या वेळी दिला.
आंदोलकांच्या भेटी घेऊन नेत्यांनी दिले मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन
मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा या दोन्ही आंदोलनांना राजकीय नेत्यांकडून भेटी देण्यात येत होत्या. मात्र दोन्ही आंदोलकांनी केलेल्या सामायिक मागण्यांवर सर्व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच मराठा विद्यार्थ्यांना वसतिगृह, शैक्षणिक सवलत अशा विविध मागण्या कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.