महापालिकेच्या समाज मंदिरात दारु अन् नाच-गाण्याची पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 10:02 PM2021-01-02T22:02:40+5:302021-01-02T22:09:33+5:30
शुक्रवार १ जानेवारी रोजी रात्री ह्या पालिकेच्या समाज मंदिरात चक्क दारूची पार्टी रंगली . मोठ्याने ध्वनिक्षेप लावून गाणी आणि त्यावर नाच चालला होता. पार्टी सुरु असल्याचे कळल्यावर काहींनी तेथे गर्दी केली.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर येथील समाज मंदिर मध्ये चक्क दारू आणि नाच गाण्याची पार्टी रंगल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक रहिवाश्यानीच तक्रार केल्यावर नगरसेवक पंकज पांडेय यांनी पालिका आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली आहे. भाईंदर पश्चिमेस गणेश देवल नगर झोपडपट्टीत महापालिकेने सरकारी जमिनीवर सीआरझेड व कांदळवन क्षेत्रात १ मजली पक्की इमारत बांधली आहे . सदर इमारतीत हॉल बांधले असून समाज मंदिर म्हणून सदर वास्तूचा वापर केला जात आहे.
शुक्रवार १ जानेवारी रोजी रात्री ह्या पालिकेच्या समाज मंदिरात चक्क दारूची पार्टी रंगली . मोठ्याने ध्वनिक्षेप लावून गाणी आणि त्यावर नाच चालला होता. पार्टी सुरु असल्याचे कळल्यावर काहींनी तेथे गर्दी केली . तर एकाने ह्या पार्टीचे छायाचित्रण केले असून ते सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे . व्हिडिओत गाण्यावर नाचगाणे आणि बाटल्या दिसून येत आहेत.
सदर पार्टीची व्हिडीओ क्लिप व स्थानिक रहिवाश्यांनी सदर पार्टीवर कारवाईची मागणी केल्या नंतर स्थानिक भाजपा नगरसेवक पंकज पांडेय यांनी पालिका आयुक्त डॉ . विजय राठोड सह संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या आहेत . पंकज यांनी शनिवारी सदर समाज मंदिराची पाहणी केली असता दारूच्या फुटलेल्या बाटल्या आदी आत पडलेल्या आढळून आल्या. सदर समाज मंदिर साठी पालिकेने लाखो रुपयांचा निधी खर्च केला असून पालिकेच्या दुर्लक्षा मुळे आधी देखील येथील पंखे वाकवणे , खिडक्यांच्या काचा फोडणे , आतील लाईटीची बटणे आदी चोरी करणे सारखे प्रकार सतत घडले आहेत . त्यातच सदर पार्टी करण्यासाठी समाज मंदिराची परवानगी आणि चावी कोणी दिली ? समाज मंदिराचा गैर वापर केल्या प्रकरणी पालिका कोणावर कारवाई करणार ? असे सवाल स्थानिक रहिवाशी करत आहेत.
ह्या प्रकरणी प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे संपर्क साधला असता त्यांचा पालिकेच्या भ्रमणध्वनी क्रमांक बंद होता . तर कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या कडून प्रतिसाद मिळाला नाही . पार्टी सुरु असल्याची तक्रार मिळाल्या नंतर भाईंदर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक युवराज शिरसाट सह बेलेकर , गावडे आदींनी माहिती घेतली असता ती वाढदिवसाची पार्टी असल्याचे सांगण्यात आले . पोलिसांनी कोविड अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे .