मुंबई : वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे लॉकडाउन कालावधीत विनापरवानगी मद्याची वाहतूक व अफरातफरी होत असल्याचे समोर आले आहे.२३ मार्चला लॉकडाउन जाहीर झाल्यापासून एनएससीआयचे कमिटी सदस्य व सेंट्रल कॉन्सिल मेंबर कोणत्याही अधिकाराविना क्लबमधून किमान आठ ते दहा वेळा मद्य बाहेर घेऊन गेल्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत क्लबच्या काही सदस्यांनी राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्याकडे तक्रार केली आहे.क्लबमधील बार गोडाउन व बारमधून हे मद्य बाहेर नेण्यात आले. या मद्याची किंमत सुमारे १० ते १२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची गरज असून उत्पादन शुल्क विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बारला सील करून हा क्लब बंद करावा, अशीही मागणी केली जात आहे.विनापरवानगी मद्य बाहेर नेणाऱ्यांची नावेही तक्रारीत देण्यात आली आहेत. या प्रकरणी बारमधील स्टॉकची पडताळणी करावी व चौकशी करावी, यामध्ये गुंतलेल्या पदाधिकारी, समिती सदस्य व बारमधील कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी. एनएससीआयमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये याबाबत माहिती मिळेल, त्यामुळे हे फूटेज नष्ट होण्यापूर्वी त्वरित ताब्यात घ्यावे, हा यामध्ये अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकेल असे, तक्रारदारांनी म्हटले आहे.बारमध्ये काम करणारे काही कर्मचारी या सदस्यांना वारंवार अशा प्रकारे मद्य देत असल्याचे समजते. त्यामुळे एनएससीआय येथील मद्याच्या साठ्याची पडताळणी केल्यास या घोटाळ्यात आणखी काही जणांचा समावेश असल्याचे समोर येईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही मंडळी सकाळी साधारण सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास येतात व बार स्टोअर, बार गोडाउनमधून मद्य घेतात.या प्रकरणी येथील सुरक्षारक्षकांना माहिती असल्याने त्यांच्याशी चर्चा केल्यास अधिक माहिती मिळू शकेल. २३ मार्च रोजी एनएससीआयमध्ये असलेला मद्यसाठा व आता प्रत्यक्षात असलेला मद्यसाठा याची तपासणी व पडताळणी केल्यावर सर्व बाबी त्वरित समोर येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.दोषींवर कारवाई होणारसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनएससीआयमध्ये सध्या कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आल्याने तिथे प्रत्यक्ष जाणे शक्य नाही. याबाबतची चौकशी केली जात असून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
एनएससीआयमध्ये ‘मद्य’घोटाळा; लॉकडाउन कालावधीत मद्य विनापरवानगी घरी नेण्याचे प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 3:49 AM