मुंबई : मद्यपानाच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी एसटी महामंडळातील वाहतूक खाते, सुरक्षा आणि दक्षता खाते संयुक्तपणे दोन दिवस मद्यपान तपासणी मोहीम राबविणार आहे; परंतु राबविण्यात येणाऱ्या दोन दिवसांच्या मोहिमेच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही मोहीम पारदर्शकपणे कशी राबवली असा प्रश्न उपस्थित होत आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सध्या एसटी चालकांनी कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याबाबत प्रकरणे आढळल्याने नाराजी व्यक्त केली होती. एसटी महामंडळात बहुतांशी आगारात अल्कोटेस्ट मशीन दिल्या असताना स्थानकावर, तसेच मार्ग तपासणीदरम्यान मद्यपान करणाऱ्या चालकांची तपासणी करण्याबाबत परिपत्रक सूचनादेखील आहे; परंतु तरीही कामगिरीवर असणारे चालक मद्यपान केल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील सर्व मार्गावरील प्रामुख्याने महामार्गावरील बस मध्यम व लांब पल्ल्याच्या बस, रातराण्या यावरील चालकांची १०० टक्के मद्यपान तपासणी करण्यासाठी २ दिवसांची मोहीम राबवावी, अशा सूचना दिल्या आहेत.
तपासणीसाठी पूर्वसूचना कशाला?मुख्य बसस्थानके, जिल्हा मार्गावरील प्रमुख, आगारांतर्गत येणारी बसस्थानके आदी ठिकाणी तपासणी केली जाणार आहे; परंतु याबाबत माहिती जाहीर केल्यानंतर दोन दिवस चालक सतर्क राहतील. त्यानंतर पुन्हा मद्यपान करतील अशी शक्यता आहे.
एसटी महामंडळाकडून नियमितपणे तपासणी केली जाते. दोन दिवसांत एकाचवेळी राज्यात एसटीच्या आगार, बसस्थानक, कार्यशाळा सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी होईल. - शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक (वाहतूक) एसटी महामंडळ