मुंबई : आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून आलेल्या अनोळखी मृतदेह आणि खुनाचा छडा लावण्यात गुन्हा अन्वेषण शाखा कक्ष-९ च्या पथकाला यश आले आहे. मद्यपी भावाच्या छळाला कंटाळून बहिणीने मेव्हण्याच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी रेश्मा सुशील ओव्हाळ (वय २९) व सुमित चंद्रकांत पाटणकर (३२) यांना अटक केली आहे.
दोघांनी देवेंद्र नरेंद्र आखाडे (३२) याची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर, मृतदेहाचे हातपाय बांधून चेंबूर येथील चिखलवाडी येथील झाडीत फेकून दिला होता, असे पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण-१) अकबर पठाण यांनी सांगितले.
आरसीएफ पोलिसांना ३ डिसेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास झुडपात हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृताच्या गळ्यावर खुणा होत्या. मात्र, त्यांची ओळख पटत नव्हती. याबाबत स्थानिक पोलिसांबरोबरच गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-९कडून समांतर तपास करण्यात येत होता. तेथील कॉन्स्टेबल अंकुश वानखेडे यांना मृतदेह मिळाल्याच्या ठिकाणी १ डिसेंबरला मध्यरात्री एक पुरुष व महिला संशयास्पद अवस्थेत फिरत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्याबाबत सहायक आयुक्त भारत भोईटे व वरिष्ठ निरीक्षक महेश देसाई यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार संबंधित वर्णनाच्या व्यक्तिंचा सलग तीन दिवस शोध घेत होते. त्यानुसार, रेश्मा ओव्हाळ हिचा शोध घेऊन चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली.
भाऊ देवेंद्र आखाडे याला दारूचे व्यसन होते. नशेत तो नेहमी घरातील सर्वांना शिवीगाळ करीत मारहाण करीत असे, त्यामुळे तिने बहिणीचा नवरा सुमित पाटणकर याच्या मदतीने त्याचा कायमचा काटा काढविण्याचे ठरविले. १ डिसेंबरला रात्री दारूच्या नशेत असताना त्याला गळा दाबून मारले.
शिवीगाळ, मारहाण करत असल्याने खून
देवेंद्र आखाडे याला दारूचे व्यसन होते. नशेत तो नेहमी घरातील सर्वांना शिवीगाळ करीत मारहाण करीत असे, त्यामुळे तिने बहिणीचा नवरा सुमित पाटणकर याच्या मदतीने त्याचा कायमचा काटा काढविण्याचे ठरविले. १ डिसेंबरला रात्री दारूच्या नशेत असताना त्याला गळा दाबून मारले. त्यानंतर, त्याचे हातपाय बांधून एका रिक्षातून निर्जन झाडीत नेऊन टाकले होते. पोलीस चौकशीत रेश्मा ओव्हाळने याची कबुली दिली.