Join us

जादा दराने वस्तू विकणार्‍या दुकानदारांना शासनाचा कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 6:23 PM

राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही.

मुंबई : राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांना वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे असे राज्य शासनाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनतेला आश्वस्त केले अाहे. टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ​

​जीवनावश्यक वस्तूंच्या आणि औषधांच्या पुरवठ्याबाबत राज्य शासनाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात शासन करीत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर तपशील विशद करण्यात आला आहे. ​अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक, मजूर-कामगारांना प्रवासासाठी पासेस अशा काही उपाययोजनांमुळे, राज्यात लॉकडाऊनच्यानंतर किरकोळ विक्रीची दुकाने, किराणा दुकाने यांच्यासंदर्भात काही प्रमाणात निर्माण झालेली परिस्थिती गेल्या सहा सात दिवसांमध्ये  सुधारली आहे.  

​तांदूळ, गहू, गव्हाचे पीठ, कडधान्य खास करून तूर आणि चनाडाळ, खाद्यतेल, कांदे, बटाटे, साखर, मीठ, मसाले यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा राज्यात तुटवडा नाही, असे स्पष्ट करून स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून अन्न धान्याचा पुरवठा करण्यासाठी राज्यात मुबलक प्रमाणात धान्याचा साठा उपलब्ध आहे, याची ग्वाही शासनाने दिली आहे. राज्यांतर्गत होणार्‍या माल वाहतुकीवर आणि पॅकेजिंग उद्योगावर हे क्षेत्र बऱ्यापैकी अवलंबून आहे. मजूर कमी संख्येने उपलब्ध असणे आणि पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या वस्तूंची कमतरता असणे यामुळे काही प्रमाणात पुरवठा साखळीवर थोडा परिणाम झाला असला तरीही, विशेषत: हा मुंबईसारख्या मोठ्या शहरातील किरकोळ दुकानांच्या क्षेत्रातील पुरवठा साखळी सुरळीत व्हावी याकरिता मोठ्या व्यावसायिकांबरोबर राज्य शासनाची यंत्रणा सातत्याने संपर्कात आहे,   

​नागरिकांनी घाबरुन जाण्याचे व वस्तूंचा साठा करण्याचे कोणतेच कारण नाही. अत्यावश्यक वस्तूंची आणि औषधांची पुरवठा साखळी अबाधित कार्यरत राहण्याकरिता राज्य शासनाने नेमलेला सचिवांचा गट परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.  गेल्या पाच दिवसात स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य घेणाऱ्या लाभार्थीपैकी सुमारे 30 टक्के धान्य उचलले आहे.  विशेष महत्त्वाचे म्हणजे किराणा दुकाने ही अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत समाविष्ट करण्यात आली आहेत. ही दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उघडी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :अन्नकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस