अत्यावश्यक सेवेतील रेल्वेचा विद्युत विभाग सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 05:36 PM2020-04-13T17:36:38+5:302020-04-13T17:37:21+5:30
मालगाड्यांची वाहतूक सुरक्षित राहण्यासाठी मध्य रेल्वेचा अत्यावश्यक सेवेतील विद्युत विभाग सतर्कपणे काम करत आहे.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद आहे. २४ तास मालगाड्यांची वाहतूक सेवा सुरु आहे. हि मालगाड्यांची वाहतूक सुरक्षित राहण्यासाठी मध्य रेल्वेचा अत्यावश्यक सेवेतील विद्युत विभाग सतर्कपणे काम करत आहे.
मध्य रेल्वेच्या विद्युत विभागाची ट्रॅक्शन डिस्ट्रीब्यूशन (टीआरडी) शाखा मुख्यत्वे रेल्वेला ओव्हरहेड इलेक्ट्रिकल वीजपुरवठ्याची जबाबदारी सांभाळते. रेल्वेच्या सुरळीत सेवा सुरु राहण्यात विद्युत विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. अन्नधान्य, औषधे, भाजीपाला, माल आणि पार्सल गाड्यांद्वारे आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु आहे. हि सेवा अशीच सुरु राहण्यासाठी ओव्हर हेड इक्विपमेंट्स (ओएचई) आणि वीजपुरवठा प्रतिष्ठापन (पीएसआय) च्या देखभालीसाठी टीआरडी शाखा अथक प्रयत्न करीत आहे.
मध्य रेल्वेच्या टीआरडी शाखेने मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ या पाचही विभागात पॉवर ब्लॉक द्वारे गाड्यांची वाहतूक होण्यासाठी नियोजन केले आहे. क्रॉसओव्हर, टर्नआउट्स, मास्ट्स, कॅन्टीलीव्हर इत्यादींची देखभाल सुनिश्चित केली आहे. रेल्वेला योग्य विद्युत पुरवठा होण्यासाठी आणि रेल्वे योग्यरित्या चालवण्याच्या दृष्टीने ओव्हर हेड इक्विपमेंट्सची (ओएचई) टॉवर वॅगन व पायी पेट्रोलिंगद्वारे विभागांतील लाइव्ह लाईन चेकिंग केली जात आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व कर्मचार्यांना मास्क, सॅनिटायझर्स, साबण, हातमोजे, जंतुनाशके दिली जात आहे. यासह कामकाजाच्या दरम्यान सामाजिक अंतर देखील सुनिश्चित केले आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिली आहे. देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या काळात देशभरात गरजू नागरिकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु रहावा. यासाठी या कठीण काळात टीआरडी अधिकारी काम करत आहेत. याबद्दल या कामाचे कौतुक मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने केले जात आहे.