Join us  

मुलगी सायबर बुलिंगच्या जाळ्यात नाही ना? समजून घ्या सायबर बुलींग म्हणजे नेमकं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 10:00 AM

सध्याच्या घडीला जगात इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक, स्नॅपचॅट आणि यूट्यूबचा वापर सर्रास करण्यात विशेषत: लहान मुले आघाडीवर आहेत.

मुंबई : आजच्या जगात इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक, स्नॅपचॅट आणि यूट्यूबचा वापर सर्रास करण्यात विशेषत: लहान मुले आघाडीवर आहेत. याचा वापर करताना त्यांचे सायबर बुलिंग होत नाही ना, याची काळजी पालकांनी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यासाठी मुलांसोबत संवाद साधणे, त्यांना विश्वासात घेत मेंदू आणि मनाला प्रशिक्षित करण्याचे कौशल्य प्रत्येक पालकाला अवगत करणे गरजेचे आहे.

सायबर बुलिंग म्हणजे काय?

साेशल मीडियावरील नामांकित ॲप्समधून सायबर बुलिंग घडण्याची भीती मुलांसाठी काम करणाऱ्या विविध एनजीओकडून व्यक्त केली जाते.

 एखाद्याला धमकाविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाचा वापर, विशेषत: भीतीदायक किंवा धमकी देणारे संदेश पाठवणे याला सायबर बुलिंग म्हणतात.

 बऱ्याचदा मुले या सायबर गुंडगिरीचे बळी असले तरी घाबरून ते कबूल करत नाहीत.

हेल्पलाइनवर मुलींच्या तक्रारी अधिक !

सायबर बुलिंगच्या जाळ्यात अडकलेल्या मुलींमध्ये १६ ते २५ वयोगटाची संख्या अधिक आहे. यात सायबर धमक्या, संमतीशिवाय अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करणे, अशा प्रकरणांची संख्या जास्त आहे. 

ऑनलाइन परिणाम, बदनामी, लैंगिक सुस्पष्ट सामग्रीद्वारे छळ, याचा त्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध हेल्पलाइन्सवर या मुलींकडून मदत मागितली जाते.

अत्याचाराचे ५ हजारे गुन्हे नोंद :-

मुंबईत महिला अत्याचाराच्या ५ हजार ४१० गुन्हे नोंद होत त्यात ५३१ अल्पवयीन मुलींसह ८७८ महिलांचा समावेश आहे. यापैकी ८४७ गुन्हे उघडकीस आले आहेत.

१० ते १२ वयापासून मुले डेटिंग करतात. एकमेकांबाबत त्यांना क्रश असतो आणि बऱ्याचदा या संगतीत सोशल मीडियावर येणारे पॉर्न साइट्चे व्हिडीयो पाहणे त्यांना कौतुकाचे वाटते. पालक नोकरीधंद्यामुळे मुलांना क्वॉलिटी टाइम देऊ शकत नाही, याची गिल्ट त्यांच्या मनात असते. मात्र निदान त्यांच्या गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडबद्दल मोकळेपणाने बोलणे आणि ‘परवानगी/कन्सेंट’बद्दल जागरूक करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. असा काही प्रकार घडल्यास ते त्वरित तुमची मदत मागू शकतील.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी