रेल्वे स्थानकांत ‘अलर्ट’; गर्दीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 01:37 AM2019-05-17T01:37:22+5:302019-05-17T01:37:33+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढविण्यात येणार आहे. सुरक्षा विभागाला गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- कुलदीप घायवट
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढविण्यात येणार आहे. सुरक्षा विभागाला गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बल पूर्ण तयारीनिशी रेल्वे स्थानकांवर तैनात राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी आहे. या पार्श्वभूमीवर २० ते २४ मेपर्यंत गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानके या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येणार आहे. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
देशात पुलवामा येथे सीआरएफए जवानांवर झालेला हल्ला, कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेसच्या शौचालयात कमी तीव्रतेचा स्फोट तसेच कर्जत-आपटा एसटीत आयईडी बॉम्ब आढळून आला. या तिन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी पोलीस ताफा वाढविण्यात आला आहे.
रेल्वे बोर्डाच्या सूचनेप्रमाणे मुख्यत: गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा विभागाने बंदोबस्त वाढविला आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी अचानक तपासणी सुरू केली आहे. श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक, रेल्वे सुरक्षा दल पथक, रेल्वे पोलीस व इतर सुरक्षा विभाग अलर्ट राहून अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी प्रयत्नशील आहेत. रेल्वे स्थानकावर ‘आॅपरेशन बॉक्स’द्वारे स्टॉल, रेल्वे डबे, कचराकुंडी यांची तपासणी करण्यात येते. हमाल, सफाई कामगार यांना कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांस कळविण्यास सांगण्यात आले आहे, असे मध्य रेल्वे आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.
रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. पुलवामाची घटना ताजी असल्यामुळे प्रत्येक स्थानकावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासह निवडणुकीच्या काळात बंदोबस्तावर विशेष लक्ष असेल. रेल्वे बलाचे सुरक्षा पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक आतापासूनच आपले काम करत आहे.
- अश्ररफ के. के., विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे