Join us  

अली असगरला अंतरिम दिलासा

By admin | Published: January 16, 2016 1:59 AM

कॉमेडी नाईट विथ कपिल’मध्ये स्वयंघोषित संत गुरुमीत राम रहीम सिंग यांची नक्कल करून त्यांची टर उडविणाऱ्या आठ कलाकारांवर पंजाबमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

मुंबई : ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’मध्ये स्वयंघोषित संत गुरुमीत राम रहीम सिंग यांची नक्कल करून त्यांची टर उडविणाऱ्या आठ कलाकारांवर पंजाबमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये या शोमधील प्रसिद्ध पात्र ‘दादी’ म्हणजेच असगर अलीवरही एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अटक होईल या भीतीने अलीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. शुक्रवारच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने अलीला सात दिवस ताब्यात घेऊ नये, असा आदेश पोलिसांना दिला. अली असगरच्या सहकारी किकू शरद याला मंगळवारी पंजाब- हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अली असगरने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. अजय गडकरी यांच्यापुढे या याचिकेवर सुनावणी होती. अली असगर याने पोलिसांपुढे व पंजाब-हरियाणा न्यायालयापुढे उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यासाठी अटक करण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. अली असगर त्याचा सहकारी किकू शरद, गुरव गेरा, राजीव ठाकूर, पूजा बॅनर्जी, मौनी रॉय, गौतम गुलाटी आणि सना खान यांच्याविरुद्ध पंजाबमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’मध्ये ‘जश्न-ए-उम्मीद’ या भागात स्वयंघोषित संत गुरमीत राम रहीम सिंग यांच्याप्रमाणेच वेषभूषा केलेला कलाकार नाच करताना, मद्यपान करताना आणि दान घेताना दाखवला आहे. त्यावर डेरा सच्चा सौदा या पंथाच्या लोकांनी आक्षेप घेत या सर्वांवर एफआयआर नोंदवला. (प्रतिनिधी)- कलाकारांवर आयपीसी कलम २९५ (ए) (धार्मिक भावना दुखावणारे कृत्य) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. - या कलमांतर्गत पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलीस जामीन मंजूर करू शकत नाहीत. त्यासाठी आरोपीला न्यायालयाचा आदेश आणणे भाग आहे.