पर्यटनमंत्र्यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धन या पर्यटनस्थळांना ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केली. ठाकरे आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या पुढाकारातून मुंबई, पुण्यापासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील या पर्यटनस्थळांच्या विकासास चालना देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या पर्यटनस्थळांना ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने शासनामार्फत येथे विविध पर्यटन सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येईल. यामुळे येथील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असे ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील अलिबाग हे विस्तृत समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. समुद्रातील शिवकालीन ऐतिहासिक कुलाबा किल्ला, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांची समाधी, १५० वर्षे जुनी ब्रिटिशकालीन वेधशाळा, श्रीकनकेश्वर, श्रीसिद्धेश्वर, श्रीरामेश्वर, श्रीबालाजी मंदिर, श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर इत्यादी शिवकालीन पुरातन मंदिरे, ज्यू समाजाचे प्रार्थना मंदिर, हिराकोट किल्ला व तलाव इत्यादी ऐतिहासिक पर्यटनस्थळे येथे आहेत.
मुरुड-जंजिऱ्याची भौगोलिक स्थिती आकर्षित करणारी आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री भोगेश्वर मंदिर तसेच श्री लक्ष्मी नारायण व इतर पुरातन मंदीरे आहेत. मुरुड-जंजिरा हा ऐतिहासिक जलदुर्ग असून या जलदुर्गास देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात. जवळच असलेले फणसाड अभयारण्य आणि खोकरी टॉम्ब हेही पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे.
श्रीवर्धन नगर परिषद क्षेत्रात कालभैरव, जीवनेश्वर, सोमजादेवी, कुसुमावती इत्यादी देवस्थाने व पेशवे मंदिर इत्यादी वास्तू पेशवाई किंवा त्या अगोदरच्या काळातील आहेत. तसेच श्रीवर्धन येथे सुमारे ४ किमी लांबीचा समुद्र किनारा असून येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात.