Join us  

अलिबागमधील तरुणाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवणारे पोलिसांच्या जाळ्यात

By राजेश भोस्तेकर | Published: February 12, 2023 9:35 PM

अलिबाग पोलिसांनी चोवीस तासात लावला छडा, महिलेसह अलिबागमधील एक जण अटक

अलिबाग :अलिबाग मधील एका तरुणाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून त्याला शारीरिक संबंधाची व्हिडिओ क्लिप पाठवून पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या ललनाला आणि त्याच्या साथीदाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. धनश्री तावरे आणि संजय सावंत असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. फिल्मी स्टाईलने सापळा रचून अलिबाग पोलिसांना या सायबर गुन्ह्याचा छडा चोवीस तासात लावण्यात यश आले. तरुणांनी ही अशा हनी ट्रॅप च्या जाळ्यात अडकू नका असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे. 

जागा बघण्याच्या उद्देशाने ती आली. जागा न बघता आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढून कॉटेजवर दोघांनी मज्जाही केली आणि तिथेच तो ललनेच्या मोह जाळ्यात अडकला आणि डोक्याला हात मारून बसला. मोह जाळ्यात अडकलेल्या तरुणाकडे पाच लाखाची खंडणी मागून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना अलिबाग तालुक्यात घडली आहे. याबाबत मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

या गुन्ह्याची गंभीरता ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजीव पाटील आणि पोलीस कर्मचारी यांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. फिर्यादी यांना वारंवार आरोपी फोन करून पैशाची मागणी करीत होते. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. ११ फेब्रुवारी रोजी आरोपी यांनी फिर्यादी याना फोन करून पाच लाख रक्कम आणण्यास सागितले होते. त्यानुसार आरोपी याना मुंबईत बोलावले तर पोलीस ही सध्या वेषात त्याच्या आजूबाजूला होते. 

आरोपी धनश्री हिने फिर्यादी याना सतत फोन करून कुठे यायचे याची कल्पना देत होती. अखेर चर्चगेट रेल्वे स्टेशन वर बोलावले. त्यानंतर काही वेळाने महिलासुध्दा चर्चगेट रेल्वे स्टेशन येथे आल्याचे दिसुन आले. पोलीस पथके देखील त्यांचे मागे जावुन पुन्हा चर्चगेट रेल्वेस्टेशन परीसरात सापळा रचुन टेहळणी करत उभे राहीले. चर्चगेट रेल्वेस्टेशन येथील परिसरात काही वेळानंतर सदर महिला या फिर्यादी यांना भेटुन अज्ञात आरोपीत यांची येण्याची वाट बघण्याचे नाटक करू लागली. थोडया वेळाने सदर महिलेचा भाचा हा सदर ठिकाणी येवुन त्याने महिलेच्या सांगण्यावरून फिर्यादी यांचेकडुन पैशांची पिशवी स्विकारली व तो जाण्यास निघाला असता पोलीस पथकाने महिलेचा भाचा व महिला असे दोघांस चौकशीकामी ताब्यात घेतले. त्यांचेकडे चौकशी केल्यानंतर महिलेचा भाचा याचा सदर गुन्हयात सहभाग नसलेबाबत दिसुन आले. 

त्यानंतर महिलेकडे कौशल्यपुर्वक तपास करता महिलेने अलिबाग येथील राहणा-या एका इसमाच्या सोबतीने सदरचा गुन्हा केलेला असल्याचे स्पष्ट झाले. सदर वेळी तात्काळ तपास पथकाने तांत्रिक तपासाची मदत घेवुन पोयनाड पोलीस ठाणे हद्दीतील मौजे तळवडे, अलिबाग या गावात जावुन सदर गुन्हयातील आरोपीत यास तपासकामी ताब्यात घेतले. सदर दोन्ही आरोपीत यांना गुन्हयात अटक करून त्यांचेकडे पुढील तपास सुरू आहे.सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक रायगड, अतुल झेंडे, अपर पोलीस अधिक्षक रायगड, सोनाली कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि शैलेश सणस, अलिबाग पोलीस ठाणे, सपोनी राजीव पाटील, मांडवा सागरी पेालीस ठाणे व मांडवा सागरी पोलीस ठाण्याकडील मपोसई डी.पी.खाडे, चेतन म्हात्रे, प्रशांत घरत, सुधिर पाटील यांनी सदरची कामगिरी पार पाडलेली आहे.

टॅग्स :मुंबईअलिबागहनीट्रॅप