हापूस आला रे! मुंबईत पहिला आंबा पाठवण्याचा मान अलिबागला मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 10:41 PM2023-02-01T22:41:17+5:302023-02-01T22:41:59+5:30
हा आंबा त्यांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारात पाठवला आहे .
मुंबई - यंदाच्या हंगामात रायगड जिल्हयातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळाला आहे. अलिबाग तालुक्यातील नारंगी येथील बागायतदार एस. के. मँगोजचे मालक वरूण संजयकुमार पाटील यांनी १ फेब्रुवारी रोजी प्रत्येकी दोन डझनाच्या हापूसच्या ७ आणि केशरच्या ५ पेटयांची अशा एकूण १२ बॉक्सची काढणी करून आंबा मुंबई बाजारात पाठवला आहे.
यंदादेखील आंबा बागायतदारांवर निसर्गाने अवकृपा केली आहे. सातत्याने बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसतो आहे. लांबणारा पाऊस, खराब हवामान, पिकांवर येणारे आजार अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करून वरूण संजयकुमार पाटील यांनी यशस्वीरित्या आंब्याची काढणी करून रायगड जिल्हयातून पहिला आंबा बाजारात पाठवण्याचा मान पटकावला आहे.
हा आंबा त्यांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारात पाठवला आहे .जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी वरूण यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील हंगामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.