जयंत धुळप ल्ल अलिबागपनवेल : अलिबाग ही एसटी पेण तालुक्यातील जिते गावातील बसथांब्यावर भररस्त्यात अडवून, महिला बसवाहक धनिष्ठा भोयर यांना धक्काबुक्की करून, बसचालक नानासाहेब तुकाराम जगताप यांना काही गुंडांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी अलिबाग बस आगारातील चालकांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पनवेल-अलिबाग एसटी पनवेल आगारात उभा होती. त्यावेळी जिते गावातील काही प्रवासी येऊन बसमध्ये बसले. गाडी फलाटावर लावल्यावर बसा, असे चालक नानासाहेब जगताप व महिला वाहक धनिष्ठा भोयर यांनी प्रवाशांना सांगितले असता, ते संतप्त झाले. बस मार्गस्थ झाली असता या प्रवाशांनी आपल्या मित्रांना फोन करुन जिते एसटी बस थांब्यावर बोलावले. बस याठिकाणी पोहोचताच जीपमधून आलेल्या पाच-सहा जणांनी वाहक व चालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी एसटीचे अधिकारी गेले असता, त्यांना दादर (पेण) सागरी पोलीस ठाण्यात जाण्यास सांगण्यात आले आणि पुन्हा पेण पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. त्यामुळे याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास तब्बल तीन तास विलंब झाला. जिते थांब्यावर गेल्या वर्षभरात सहा वेळा एस.टी. वाहक व चालकांवर गुंडांकडून हल्ले झाल्याची माहिती रायगड एस.टी. विभागाचे विभागीय नियंत्रक अजित गायकवाड यांनी दिली. अलिबाग-पनवेल मार्गावर दररोज ३६ महिला वाहक काम करीत आहेत. या हल्ल्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भीती अलिबाग आगाराच्या वाहतूक नियंत्रक अपर्णा वर्तक यांनी व्यक्त केली. जिते बसथांब्यावर बस न थांबवण्याचा पवित्रा घेतला. ४गुरुवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत हल्लेखोरांना अटक करण्याचे आश्वासन पेण पोलिसांनी एसटी कामगार संघटनेस दिले होते. ते पूर्ण करण्यात पेण पोलीस अपयशी ठरले. दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षांकरिता प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची व अन्य प्रवाशांची अडचण होऊ नये याकरिता बुधवारी कामगार संघटनांनी सामोपचाराची भूमिका स्वीकारून तत्काळ कामबंद आंदोलन पुकारले नाही. ४परंतु हल्लेखोरांच्या गाड्यांचे नंबर देऊनही त्यांना अटक करण्यात पेण पोलीस अपयशी ठरल्याने अखेर एस.टी. कामगार, चालक व वाहक यांच्या संतापाचा कडेलोट होऊन अखेर गुरुवारी दुपारी १२.३० वाजता अलिबाग एस.टी. आगाराच्या सर्व कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आणि अलिबाग आगारातील एस.टी. बसेसची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ४पेण पोलिसांनी राहुल गंगाराम म्हात्रे, महेंद्र जनार्दन म्हात्रे, प्रकाश दामोदर ठाकूर, अजय विठोबा म्हात्रे, जयप्रकाश तुळशीराम म्हात्रे व देवेंद्र गंगाराम म्हात्रे या सहा हल्लेखोरांना अटक केली आहे. त्यामुळे आता एसटी बसेस सुरु करण्यात याव्यात, असे आवाहन अलिबाग आगार प्रमुखांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत रायगडचे अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक राजा पवार यांनी केले. या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.