सर्व आरोपींनी ३ डिसेंबर राेजी हजर राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:16 AM2020-12-03T04:16:46+5:302020-12-03T04:16:46+5:30
मालेगाव बॉम्बस्फोट : विशेष न्यायालयाचे निर्देश मालेगाव २००८ बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयाचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालेगाव ...
मालेगाव बॉम्बस्फोट : विशेष न्यायालयाचे निर्देश
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयाचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाचा खटला चालविणाऱ्या विशेष न्यायालयाने भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व आरोपींना ३ डिसेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. पीडितेच्या कुटुंबीयांनी हा खटला दैनंदिन चालावा, यासाठी केलेल्या अर्जावर विशेष न्यायालयाने वरील निर्देश दिले.
सरकारी वकिलांनी हा खटला जलदगतीने चालविण्यास आपली हरकत नसल्याचे म्हटले. ‘बहुतांश वेळेस आरोपींचे वकील काहीतरी सबब देऊन सुनावणी तहकूब करण्याची विनंती न्यायालयाला करतात,’ असे सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी सांगितले. विशेष न्यायालयाने प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि अन्य पाच जणांवर ऑक्टोबर २०१८ मध्ये आरोप निश्चित केले.
हा खटला जलदगतीने चालविण्यासाठी एनआयएने सर्व प्रयत्न केले. आतापर्यंत ४०० पैकी १४० साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. आधीचे न्यायाधीश निवृत्त झाल्याने आणि कोरोनामुळे या खटल्याला विलंब झाला, असे एनआयएने न्यायालयाला सांगितले.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथील मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला, तर १०० जण जखमी झाले. आरोपींवर यूएपीए अंतर्गत दहशतवादी कृत्य करणे, दहशतवादी कृत्याचा कट रचणे इत्यादी गुन्हा नोंदविला, तर भारतीय दंडसंहितेंतर्गत हत्या, फैजदारी कट रचणे, हत्येचा प्रयत्न करणे, जाणूनबुजून दुखापत पोहोचवणे, दोन धर्मांत तेढ निर्माण करणे आणि स्फोटके कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
.......................