Join us

एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मेअखेरपर्यंत लसीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मेअखेरपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले. वैमानिकांनी कामबंदचा इशारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मेअखेरपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले. वैमानिकांनी कामबंदचा इशारा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

एअर इंडियाच्या अखत्यारीतील सर्व वैमानिक आणि केबिन क्रू मेंबर्सचे प्राधान्याने लसीकरण करा, अन्यथा कामबंद करण्याचा इशारा इंडियन कमर्शिअल पायलट असोसिएशनने (आयसीपीए) दिला होता. एअर इंडियाचे १ हजार वैमानिक या संघटनेचे सभासद असल्याने त्यांनी कामबंद केल्यास दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होऊ शकतो. शिवाय, वंदे भारत अभियान आणि वैद्यकीय मालवाहतुकीलाही फटका बसू शकतो, ही बाब लक्षात घेऊन एअर इंडियाने मेअखेरपर्यंत सर्व लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र शासनाने १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणास परवानगी दिली आहे. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण हाती घेण्यात येणार आहे. मेअखेरपर्यंत लसीकरण पूर्ण केले जाईल. ४५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी व्यवस्था आधीच तयार केली आहे. त्यामुळे लसीकरण प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्यास मदत होईल, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले.