जलवाहतूक मंत्रालयाचा निर्णय; प्रमुख बंदरांसाठी सूचना जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशभरात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन ऑक्सिजन आणि संबंधित उपकरणांची वाहतूक करणाऱ्या जहाजांचे सर्व शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाने सर्व प्रमुख बंदरांना त्यासंबंधीच्या सूचना जारी केल्या आहेत.
या निर्णयानुसार, जहाजाशी संबंधित शुल्क, साठवण शुल्क माफ केले जाईल. शिवाय ऑक्सिजनशी संबंधित मालाला जहाजांवर जागा देण्यात प्राधान्य मिळावे यासाठी बंदराच्या प्रमुखांना वैयक्तिकरीत्या देखरेख ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या मालासाठी चढउतार, वहन सुरळीत व्हावे, आवश्यक मंजुरी, दस्तावेजांची पूर्तता होऊन हा माल बंदरातून लवकर बाहेर काढता यावा यासाठी सीमाशुल्क आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जहाजात ऑक्सिजनसंबंधित मालाव्यतिरिक्त इतर कंटेनर्स असतील तर बंदरात हाताळला जाणारा एकूण माल किंवा कंटेनरची संख्या लक्षात घेऊन ‘प्रो-रेट’आधारे शुल्कमाफी द्यावी. अशी जहाजे, माल, बंदराच्या फाटकातून जहाज येण्या-जाण्यासाठीचा कालावधी यावर बंदर, मालवाहतूक व जलमार्ग मंत्रालय देखरेख ठेवेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
* या वस्तूंना शुल्कमाफी
मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, ऑक्सिजन टॅक्स, ऑक्सिजन बाटल्या, पोर्टेबल ऑक्सिजन जनरेटर, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर, ऑक्सिजन सिलिंडर आणि संबंधित उपकरणे तयार करण्यासाठी लागणारे स्टील पाइप्स यांना पुढील आदेशापर्यंत शुल्कमाफी देण्यात येईल.
................................................