मुंबई: राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election 2022) अत्यंत चुरशीची झाली. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत सर्वांत मोठा धक्का काँग्रेसला बसला. काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. खरे पाहता काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे सेफ उमेदवार मानले जात होते. भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांच्यात खरी लढत झाल्याचे सांगितले जात होती. मात्र, प्रत्यक्षात भाई जगताप यांचा विजय झाला आणि चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला.
काँग्रेसने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार, पक्षाकडे ४४ आमदारांचे पाठबळ होते. मात्र, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना त्यांच्या नेमून दिलेल्या कोट्यातील केवळ ४१ मते मिळाल्याचे पाहायला मिळाले. याचाच अर्थ काँग्रेसची तीन मते फुटल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे दोन उमेदवार सोडल्यास सर्व उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत विजयी घोषित करण्यात आले.
दिल्लीत सर्व आमदारांची ‘हजेरी’
पहिल्या पसंतीच्या पहिल्या फेरीत काँग्रेसचे एकही उमेदवार विजयी झाले नाहीत. शेवटी दुसऱ्या पसंतीच्या दुसऱ्या फेरीची मतमोजणी झाल्यावर भाई जगताप विजयी झाल्याचे आणि चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्याची बाब समोर आली आहे. भाई जगताप यांना २६ मते मिळाली, तर चंद्रकांत हंडोरे यांना २२ मते मिळाली. काँग्रेसचा हा पराभव नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता काँग्रेसच्या सर्व आमदारांना मंगळवारी रात्रीपर्यंत दिल्ली येथे तातडीने बोलाविण्यात आले आहे. बुधवारी या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयातून आमदारांना तसे फोन जात आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडली हा गंभीर विषय
विधान परिषदेचा निकाल पाहता काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांना मतांचा कोटा ठरवून दिला असताना प्रत्यक्षात मिळालेल्या मतांमध्ये फरक दिसला. काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडली. हा निश्चितच गंभीर विषय आहे. याबद्दल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. हायकमांडला कळविले जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
सरकार म्हणून आता विचार करण्याची गरज
अडीच वर्ष सत्तेत राहूनही पक्षाची मतं फुटत असतील तर सरकार म्हणून आम्हाला विचार करण्याची गरज आता आहे. आपल्याच पक्षाची मतं जर फुटत असतील तर दुसऱ्यांना दोष देऊन काय उपयोग? इतरांना दोष देण्याचा मुद्दाच नाही. आम्हालाच आता विचार करण्याची गरज आहे. अडीच वर्ष सत्तेत राहूनही जर आमदारांमध्ये नाराजी असेल तर नेमकं कुठं चुकतंय याचा विचार करण्याची गरज आहे. नक्कीच आजच्या निकालाची माहिती पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवली जाईल, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी निकालानंतर दिली.