Join us  

सारेच नगरसेवक जामिनावर सुटले

By admin | Published: February 24, 2016 1:21 AM

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि मनसेचे

ठाणे : बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण या तिघांनाही प्रत्येकी एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांनी मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला. त्यामुळे तब्बल ७८ दिवसांनंतर त्यांची बुधवारी ठाणे कारागृहातून मुक्तता होणार आहे. विशेष सरकारी वकील राजा ठाकरे आणि तिघांच्याही वकीलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांना हा जामीन मंजूर केला. नजीब मुल्ला यांच्याप्रमाणेच तिघांनीही तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गोरे यांच्या कार्यालयात एक दिवसाआड हजेरी लावावी, तपासामध्ये त्यांना संपूर्ण सहकार्य करावे. तसेच सूरज परमार प्रकरणातील कोणत्याही साक्षीदार अथवा पालिकेचे अधिकारी किंवा तक्रारदार यांना धमकावू नये तसेच त्यांच्याशी संपर्क करु नये. यातील पुराव्याला बाधा येईल, असे कोणतेही कृत्य करु नये. तसेच ठाणे महापालिकेतील बैठकांना त्यांनी हजेरी लावावी, पण त्यावर आपले भाष्य करु नये आदी अटींना अधीन राहून त्यांना हा जामीन मंजूर केल्याचे न्यायालयाने म्हटले. या प्रकरणाची संवेदनशीलता व्यापक असून केवळ बांधकाम व्यावसायिकच नव्हे तर सामान्य व्यक्तींनाही या तिघांपासून भीती असल्याचा मुद्दा विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी मांडला. हा एक जनतेचा आक्रोश असल्याचेही ते म्हणाले. त्यांना जामीन मिळाल्यास ठाणे महापालिकेचे अधिकारी, साक्षीदार यांच्यावर ते दबाव आणू शकतात. तसेच पोलिसांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची निर्मिती केली आहे. (प्रतिनिधी)निर्दोष तर भूमिगत का ?गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघेही नगरसेवक भूमिगत झाले होते. त्यांचे मोबाईल नॉट रिचेबल होते. जर ते निर्दोष होते तर मग ते भूमिगत का झाले होते, असा सवालही त्यांनी उपस्थित करून या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने तिघांनाही जामीन देण्यास त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. अ‍ॅड. सावंत यांनी सुधाकर चव्हाण यांना तर कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता अपक्ष म्हणूनही सलग तीन वेळा महापालिकेवर लोकांनीच निवडून दिल्याचे त्यांनी सांगितले. तिघांचेही सामाजिक काम चांगले असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला. ‘ईएस’ म्हणजे एकनाथ शिंदे नव्हे...सूरज परमार यांच्या डायरीतील ईएस म्हणजे एकनाथ शिंदे असा दावा आपण केला नसल्याचे अ‍ॅड. हेमंत सावंत यांनी सांगितले. ईएस बद्दल पोलिसांना माहित नसेल का? असे आपण म्हटले होते. त्यामुळे इएस म्हणजे एकनाथ शिंदे हा सरकारी पक्षाचा युक्तीवाद अ‍ॅड. सावंत यांनी मागे घ्यायला लावल्यानंतर त्यांनी तो मागे घेतला.जामीन मंजूर झाल्याची वार्ता पसरताच चारही नगरसेवकांच्या समर्थकांनी जल्लोष केला. अनेक नगरसेवक तसेच चौघांच्याही समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती.असा झाला घटनाक्रमबिल्डर सूरज परमार यांनी ७ आॅक्टोंबर २०१५ रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर सूसाईड नोटच्या अहवालाच्या आधारे चारही नगरसेवकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.चौघेही नगरसेवक ५ डिसेंबर रोजी पोलिसांना शरण आले. ५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी २०१६ या ७० दिवसांमध्ये ९ दिवस पोलीस तर उर्वरित ६१ दिवस ते न्यायालयीन कोठडीत आहेत.१५ फेब्रुवारी रोजी नजीब मुल्ला यांना ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला.