नवी मुंबई : सायबर सिटीतील नरिमन पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीबीडी-बेलापूर परिसरात शनिवारी दिवसभर विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे याबाबतची कोणतीही पूर्वसूचना महावितरणकडून देण्यात आली नव्हती. त्यामुळे रेल्वे स्थानक, पोलीस आयुक्तांचे कार्यालय, परिसरातील कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये, हॉटेल्समध्ये दिवसा अंधाराचे साम्राज्य होते. सीबीडी-बेलापूर परिसरात सिडको, कोकण भवन, पोलीस आयुक्तालय, बँक अशा अनेक औद्योगिक परिसरांना याचा फटका बसला. शनिवार असल्याने बँकमधील अर्ध्या दिवसाचे कामकाजही रखडले. सकाळी आठ वाजल्यापासून अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. परिसरातील अनेक सोसायटींमध्ये विजेअभावी पाण्याची मोेटर सुरू करता आली नाही आणि त्यामुळे विजेबरोबरच पाणी कपातीच्या प्रश्नालाही सामोरे जावे लागले. सीबीडी सेक्टर १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ येथील नागरी वसाहतीतील रहिवाशांचे हाल झाले. तर बेलापूर रेल्वे स्थानक अंधारमय झाले होते. त्यामुळे प्रवाशांना मोबाइलचा टॉर्च घेऊन वावर करावा लागत होता. परिसरातील हॉटेल्स, दुकानांमधील शीतगृहांमधील वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. विजेवर चालणारी उपकरणे बंद पडल्याने कार्यालयातील महत्त्वाची कामे रखडली होती. वितरण विभागाने पूर्वकल्पना न दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. नोकरदार वर्गाची आठवड्याची सुटी तसेच शाळकरी मुलांची उन्हाळी सुटी सुरू असून या दोन्ही सुटींचा महावितरणने खेळखंडोबा केला. मोबाइलची बॅटरी चार्ज करण्यासाठीचा वीजपुरवठाच खंडित झाल्याने स्मार्ट फोनच्या विश्वात जगणाऱ्या तरुणाईला शनिवारी फोनशिवाय दिवस काढावा लागला. अचानक वीजपुरवठा खंडित केल्याने व्यापारीवर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी महावितरणच्या बेजबाबदारपणाबाबत नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)च्महावितरण कंपनीच्या सीबीडी उपविभागाच्या २२ केव्ही उरण फाटा फिडवर देखभाल दुरुस्तीसाठी रविवार, २४ मे रोजी सीबीडी-बेलापूर परिसरातील काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. च्सकाळी १० ते ५ या वेळेत सी. पी. आॅफिस, सिडको भवन, कोकण भवन, पार्क हॉटेल, किल्ला गावठाण, रेतीबंदर, उलवे रोड, मोरवे, गणेशपुरी, मोहा, बामनडोंगरी, हाळ, तारघर, कोंबडभुजे, कोपरागाव, जवळा, शेलघर गाव, वॉटर पंप सेक्टर १, सेक्टर ७, सेक्टर १२ या परिसरातील वीजपुरवठा खंडित राहील.विजेअभावी घोर निराशा : बेलापूर रेल्वे स्टेशन दिवसाही अंधारात, तिकीट खिडकीजवळ जाण्यासाठी प्रवाशांनी घेतला टॉर्चचा आधार, प्लॅटफॉर्मवर चढताना अनेकांचे घसरले पाय, उकाड्यामुळे दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात आइस्क्रीमचा साठा करून ठेवला होता परंतु, विजेच्या या खेळामुळे आइस्क्रीम वितळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बँकेतली कामकाजे रखडली, सुटीच्या दिवशी उकाड्याने केले हैराण
बेलापूरमध्ये दिवसभर बत्तीगुल
By admin | Published: May 24, 2015 1:06 AM