'अख्खा दिवस गेला, पण काँग्रेस नेतृत्वाचं बाळासाहेबांबद्दल एक ट्विट वा मसेजही दिसला नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 08:43 PM2020-11-17T20:43:36+5:302020-11-17T20:44:27+5:30
भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आठव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केले. यानिमित्त ट्विट करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला.
मुंबई - दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 8 व्या स्मृतीदिनी राज्यातील सर्वच दिग्गजांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. भाजपा नेत्यांनीही बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. तर, राणे पिता पुत्रांकडूनही बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलं आहे. मात्र, बाळासाहेबांना अभिवादन करताना, शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्यही करण्यात आलं. खासदार नारायण राणे, निलेश राणे आणि आता आमदार नितेश राणे यांनीही शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आठव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केले. यानिमित्त ट्विट करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. राणे ट्विट करत म्हणाले, “साहेब आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती. पद आणि पैशासाठी आपण तत्वांशी कधीही प्रतारणा केली नसती.", असे म्हटले. तसेच, पद आणि पैशासाठी आपण तत्वांशी कधीही प्रतारणा केली नसती. महाराष्ट्रातील आताचे सरकार नीतिमत्ता सोडून केवळ तडजोडीवर तयार झाले आहे. आपण असता तर हे घडू दिले नसते.", असेही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील आताचे सरकार नीतिमत्ता सोडून केवळ तडजोडीवर तयार झाले आहे. आपण असता तर हे घडू दिले नसते. (२/२) #BalasahebThackeray
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 17, 2020
नारायण राणे यांच्या शिवाय त्यांचा मुलगा नितेश राणे यांनीही आज दोन ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश यांनी उद्धव ठाकरे इंदिरा गांधींना अभिवादन करतानाचा फोटो ट्विट करतात. "दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या फोटोसमोरील राहुल गांधींच्या अशाच फोटोची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही?? असा खोचक प्रश्न केला होता. त्यानंतर, लगेच दुसरे ट्विट करुन अख्खा दिवस गेला तरी काँग्रेस नेतृत्वाकडून बाळासाहेबांच्या पुण्यतिथीदिनी एक मेसेज किंवा ट्विटही काँग्रेस नेतृत्वाने केलं नसल्याचं नितेश यांनी म्हटलंय. तसेच, जर बाळासाहेबांनाही मान्य करत नसतील तर शिवसेनेकडे काय उरलं? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.
Entire day has passed n not a single message or tweet from the congress leadership on the death anniversary of the late Balasaheb Thackeray!
— nitesh rane (@NiteshNRane) November 17, 2020
If Balasaheb is not even acknowledged then what’s left with the Shiv Sena??
निलेश राणेंचीही खोचक टीका
''बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही... स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.'', असे ट्विट निलेश राणे यांनी केलंय. राणे कुटुंबीय आणि शिवसेनेचा वाद महाराष्ट्राला परिचीत आहे. त्यातून दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राणे कुटुंबीयांवर शाब्दीक बाण चालवले होते. त्यानंतर, राणे पिता-पुत्रांनीही शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, ट्विवरवरुन सातत्याने शिवसेनेवर प्रहार करणाऱ्या निलेश राणे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
'महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्र यावं हीच बाळासाहेबांना आदरांजली ठरेल'
रामदास आठवले यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवतीर्थावर जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर, ट्विट करुन महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याची इच्छाही व्यक्त केली. ''शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! त्यांच्या स्वप्नातील शिवशक्तीभीमशक्ती भाजप एकजूट आम्ही साकारली पण नंतरच्या काळात ती एकजूट तुटली याची खंत वाटते. भविष्यात पुन्हा ती एकजूट व्हावी हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल!'', असे ट्विट रामदास आठवले यांनी केले आहे.