शेतकऱ्यांची सगळी देणी ३१ मार्चपूर्वी देणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही; संतप्त विरोधकांचा सभात्याग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 06:53 AM2023-03-01T06:53:26+5:302023-03-01T06:53:54+5:30
शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि समर्थकांवर पोलिसांनी लाठीमार केला, अमरावतीमध्येही शेतकऱ्यांवर लाठीमाराची घटना घडली. सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील असल्याचा आरोप अजित पवार, नाना पटोले यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अतिवृष्टी, एकरकमी परतफेड प्रोत्साहन अनुदानासह शेतकऱ्यांची सर्व देणी येत्या ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधकांनी यावेळी सभात्याग केला.
विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके आदींनी शून्य तासात शेतकऱ्यांना अजूनही पूर्ण आर्थिक मदत मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. अतिवृष्टीग्रस्तांना ७५५ कोटी रुपयांची मदत केली आहे. अजून ३,३०० कोटी रु. मदतीचे प्रस्ताव असून, त्यांची छाननी करून निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांना ६,८०० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अनुदान याअंतर्गत ४७०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. आपल्या सरकारने शेतकऱ्यांना केलेल्या मदतीचा एकूण आकडा १२ हजार कोटी रुपयांवर जाणार आहे. हे देणारे सरकार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि समर्थकांवर पोलिसांनी लाठीमार केला, अमरावतीमध्येही शेतकऱ्यांवर लाठीमाराची घटना घडली. सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील असल्याचा आरोप अजित पवार, नाना पटोले यांनी केला. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
सभात्याग अन् मुख्यमंत्र्यांचा चिमटा
सरकार असंवेदनशील असल्याची टीका करत काँग्रेसचे नाना पटोले कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगत सभागृहातून जाऊ लागले; पण विरोधी पक्षातील अन्य सदस्य बसूनच होते. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी बहिष्कार आहे ना, असे विचारत पटोले यांना चिमटा काढला. नंतर विरोधकांनी सभात्याग केला.