मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सध्या भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट आमने-सामने आलेले आहेत. दोन्हीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, ठाकरे कुटुंबीयांचे कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला असून, येत्या दिवाळीपर्यंत आदित्य ठाकरे हे आर्थर रोड जेलमध्ये नाईट लाईफ साजरी करतील, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
ठाकरे गटावर निशाणा साधताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत तुमच्या मालकाचे पुत्र आदित्य ठाकरे हे येत्या दिवाळीपर्यंत आर्थर रोड जेलमध्ये नाईट लाईफ साजरी करणार आहेत. सगळे पुरावे गोळा करून सगळी बोटं आदित्य ठाकरेंकडे वळताहेत, असा दावा नित्श राणे यांनी केला.
ते ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, सामनाच्या आजच्या अग्रलेखात संतपरंपरेवर लिहिण्यात आलं आहे. नाईट लाईफचे संत नेमके कोण आहेत, यावरही आता सामनाच्या अग्रलेखातून माहिती दिली पाहिजे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात काही धाडी पडल्या आहेत. रोमवेल बिल्डर असेल, हायवे कन्स्ट्रक्शन असेल, राहुल गोम्स असेल, हे नेमके कोण आहेत. कोणासाठी भ्रष्टाचार केला आहे. कोणाच्या माध्यमातून पैसे खाल्ले आहेत. याबाबतची माहिती दिली पाहिजे.
पत्राचाळमधील आरोपीने दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी खालील मुंबईत पेंग्निव आणले तेव्हा ते याच हायवे कन्स्ट्रक्शनने आणले होते. ते कोणाच्या हट्टापाई आले तर ते आदित्य ठाकरेंसाठी आहे. ज्या रोमवेल कन्स्ट्रक्शनने कधी साधी डिस्पेन्सरी बांधली नव्हती. त्यांना कोविड सेंटर बांधण्याचं काँन्ट्रॅक्ट दिलं. तर राहुल गोम्सला मुंबई महानगरपालिकेतील सगळी कामं मिळवली. ही सगळी आदित्य ठाकरेंची माणसं. मुंबईत कुणी कुठली काँट्रॅक्ट घ्यायची हे ठरवायची.
मुंबई महानगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार कुणी केलाय, असं मी संजय राऊत यांना विचारू इच्छितो, असे नितेश राणे राणे म्हणाले. तुम्ही मुंबई लुटायची आणि मग धमक्यापण अधिकाऱ्यांना तुम्हीच द्यायच्या. मुंबई महानगरपालिकेतील सुधीर नाईक या अधिकाऱ्यांनी किती भ्रष्टाचार केला आहे, किती पैसे खाल्ले हे आज ना उद्या चौकशीमध्ये समोर येणार आहे. वर्षा बंगल्यावर वसून उद्धव ठाकरे बॅटिंग करायचे, आदित्य ठाकरे बॉलिंग टाकायचे आणि हे सुधीर नाईक विकेट किपिंग करायचे. आता ही सगळी मस्ती बाहेर येणार आहे. त्यामुळे दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा येणाऱ्या दिवाळीत आदित्य ठाकरे आर्थर रोड तुरुंगात फटाके फोडतील, याची चिंता करावी, असा सल्लाही नितेश राणे यांनी दिला.