आता कुणाचा नंबर?; किरीट सोमय्या आज नवा बॉम्ब फोडणार, पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 09:48 AM2022-04-15T09:48:45+5:302022-04-15T09:49:51+5:30
डर्टी डझन मंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणारे किरीट सोमय्या आज कोणता गौप्यस्फोट करणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
मुंबई- ठाकरे कुटुंबाशी संबंधित आणखी एका कंपनीचा घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा काल (गुरुवारी) पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी दिला आहे. आज दुपारी एक वाजता किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी डर्टी डझन मंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणारे किरीट सोमय्या आज कोणता गौप्यस्फोट करणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित कंपन्यांवर मनी लाँड्रिंगचे आरोप लावल्यानंतरकिरीट सोमय्या आज नवीन बॉम्ब फोडणार आहे. तसेच, मी नॉट रिचेबल का झालो होतो? याचंही उत्तर आज देणार असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत. ठाकरे सरकारमधील एक डझजन लोकांची प्रॉपर्टी अटॅच झाली आहे. अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिक, संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अनंतराव अडसूळ आणि इतरांची संपत्ती अटॅच झाली आहे, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.
शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी विक्रांत फाईल्स उघडल्यानंतर याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तेव्हापासून किरीट सोमय्या आणि नील सोमय्या नॉट रिचेबल होते. संजय राऊतांनीही वारंवार सोमय्या फरार असल्याचा दावा ट्विटरवरुन केला होता. अशातच मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, 1997-98 पासून विक्रांतची मोहीम सुरू झाली. विक्रांतचा कार्यक्रम सिंबॉलिक होता. विक्रांत वाचवण्यासाठी सेनेनं समर्थन दिलं होतं. 1997 सालापासून सुरुवात केली आहे. संजय राऊतांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटींग म्हणतात, असंही सोमय्यांनी यावेळी सांगितलं.
नेमकं प्रकरण काय आहे?
'INS विक्रांत' ही युद्धनौका भंगारात जाऊ नये म्हणून किरीट सोमय्यांनी सर्वसामान्य नागरिकांकडून 58 कोटी रुपये गोळा केले आणि नंतर मुलगा नील सोमय्या यांच्या कंपनीमार्फत मनी लॉण्ड्रिंग केले, असा आरोप शिवसेन नेते संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या आरोपानंतर माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.