मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि समर्थक अपक्ष आमदारांच्या मतांचा विचार केल्यास आमचे चारही उमेदवार सहज निवडून येतील, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता यावे यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी विधान भवनात अर्ज सादर केला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
पटेल म्हणाले की, ३२ वर्षांपासून राजकारणात कार्यरत आहे. या काळात देशाच्या आणि राज्याच्या हिताची कामे करण्याची संधी मिळाली. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची मते आणि समर्थक अपक्ष सदस्यांच्या मतांचा हिशोब केला तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येण्यास कोणतीही अडचण नाही.
आघाडीतील आमदारांना मतदानावेळी पक्षप्रतोदांना आपले मत दाखवावे लागते. त्यामुळे आमचे चारही उमेदवार निवडून येतील. समर्थक अपक्ष आमदारांशी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचे बोलणे झाले आहे. त्यानंतर चर्चा करुनच शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार दिला आहे. त्यामुळे आमचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.
न्यायालयात जाणारअनिल देशमुख आणि नवाब मलिक तुरुंगात असले तरी न्यायालयात अर्ज करून त्यांना मतदानाची परवानगी मिळू शकते. यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर दिली.