संजीव साबडे
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस. या तिन्ही पक्षांची स्थापना मुंबईत झाली. काँग्रेसचीही स्थापना १३७ वर्षांपूर्वी, म्हणजे १८८५ मध्ये मुंबईतच झाली होती. हा पक्ष देशांत आणि महाराष्ट्रात सर्वाधिक काळ सत्तेत होता. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत काँग्रेसची पाळेमुळे रुजल्याचा तो परिणाम होता. पण वेळोवेळी पक्षात फूट पडत गेली, त्यातून ताकद कमी होत गेली आणि काँग्रेसचा विविध कारणांस्तव कंटाळा आल्यानं जनतेने पक्षाला सत्तेतून खाली उतरवलं. त्यामुळे १९९९ पासून २०१४ पर्यंत या पक्षाला शरद पवार यांच्या पक्षाच्या मदतीनं सरकार बनवावं लागलं. मुंबईत स्थापन झालेली काँग्रेस आता तर महाराष्ट्र आणि अनेक राज्यांत विरोधी बाकांवर दिसत आहे. याउलट १९८० साली मुंबईत स्थापन झालेल्या भाजपचे केंद्र व अनेक राज्यांत स्वबळावर सरकार आहे. गेल्या ४० वर्षांत, खरं तर ३० वर्षांत भाजपची ताकद खूपच वाढली. ही वाढ विलक्षण आहे. पण गंमत अशी, की या राष्ट्रीय पक्षाला एकदाही महाराष्ट्रात स्वबळावर सरकार बनवता आलेलं नाही.
भाजपच्या आधी, १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली, तर १९९९ साली काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. हे दोन्ही पक्ष प्रादेशिक. राष्ट्रवादीची राष्ट्रीय ही मान्यताही आता गेली आहे. राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांना महाराष्ट्रात कधीही स्वतःच्या ताकदीवर सरकार बनवता आलेलं नाही. एकमेकांची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत घेऊन हे तिन्ही पक्ष राज्यात सरकार बनवत राहिले. यातील एकाही पक्षाला राज्यात कधीही बहुमत न शकल्याचा हा परिणाम होता.
आज शिवसेनेच्या एका (व अधिकृत) गटाच्या साहाय्याने भाजप राज्यात सत्तेवर आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री. भाजप मोठा भाऊ असला, तरी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नव्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे. याआधी १९९५ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. तेव्हा शिवसेना मोठा भाऊ होता. त्यामुळे मनोहर जोशी व नंतर काही काळ नारायण राणे यांना मुख्यमंत्रिपद मिळाले. पुढे २०१४ साली भाजप मोठा व शिवसेना छोटा भाऊ झाला.
देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद मिळाले आणि नाव झालं भाजप-शिवसेना युती. तेव्हा शिवसेना अडून बसल्याने एकट्या भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. म्हणजे तेव्हा भाजपबरोबर जायला राष्ट्रवादी तयार होती. पण शिवसेनेने दुय्यम भूमिका मान्य केली. पुढे २०१९ साली शिवसेनेनं मागितलेलं मुख्यमंत्रिपद भाजपने नाकारलं. त्यामुळे भाजपबरोबर जाऊन राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांनी औटघटकेचं उपमुख्यमंत्रिपद मिळवलं. पण ते सरकार टिकलं नाही आणि काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशी विचित्र महाविकास आघाडी झाली. सर्वाधिक जागा मिळूनही भाजपला सत्तेच्या बाहेर राहावं लागलं.काँग्रेसची ताकद खूप कमी झाली आहे. पण त्याचा हवा तसा फायदा भाजप, शिवसेना वा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापैकी एकही पक्ष मिळवू शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे. भाजप सत्तेच्या अगदी जवळ गेला, १२० च्या पुढे पोहोचला. पण १४५ जागांवर विजय मिळवू शकला नाही. भाजपचा सेनेमुळे मुंबई तसंच विदर्भ बालेकिल्ला राहिला, पण त्या पक्षाने पद्धतशीरपणे अन्यत्रही पाय रोवले. राष्ट्रवादीचा फोकस प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रावर राहिला आणि काँग्रेसचा सध्या एकही गड नाही. पुढील वर्षीच्या निवडणुकीत कशा आघाड्या, युत्या होणार कोणास ठाऊक.
भाजप, राष्ट्रवादीला स्वबळावर सत्ता नाही!मुंबई महापालिकेतील पूर्ण सत्ताही पूर्वी काँग्रेस व नंतरच्या काळात शिवसेना या दोन पक्षांनाच मिळाली आहे. भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांना स्वबळावर मुंबई कधीच जिंकता आली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही आतापर्यंत ते कधीही शक्य झालेलं नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी मुंबईच्या प्रश्नांकडे फारसं लक्ष दिलं नाही. शिवसेना व भाजप हे मात्र मुंबईवर लक्ष केंद्रित करत आले आहेत.