लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वेवर सध्या धावत असलेल्या सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते सोलापूर आणि नागपूर ते बिलासपूर या चारही वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांनी पसंती दिली आहे. महिन्याभरात या चारही वंदे भारत एक्स्प्रेसमधून एक लाख २२ हजारहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. यामधून मध्य रेल्वेला १० कोटी ७२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
आरामदायी, वेगवान आणि किफायतशीर दरात नागरिकांना प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे मंत्रालयाने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची निर्मिती केली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ७५ वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. सध्या मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते सोलापूर आणि नागपूर ते बिलासपूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. या चारही गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. यामुळे रेल्वेच्या महसुलातदेखील भर पडत आहे. १५ ऑगस्ट २०२३ ते ८ सप्टेंबर २०२३ दरम्यान चार वंदे भारत एक्स्प्रेसच्या १५० फेऱ्यांतून तब्बल १ लाख २२ हजार २६६ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामधून मध्य रेल्वेला १० कोटी ७२ लाख २० हजार ७१८ रुपयांचा महसूल मिळाला आहे.