मुंबई : तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या व पुढील सर्व परीक्षा १८ आॅक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आल्या असून, त्या १९ आॅक्टोबरपासून पुन्हा सुरू होतील. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. बुधवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा घेताना तांत्रिक अडचणी उद्भवणार नाहीत तसेच यासाठी पर्यायी व्यवस्थाही तयार केली जाईल. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सायबर हल्ल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना लिंक न पोहोचल्याने परीक्षा देता आली नाही, असे कारण आॅनलाइन परीक्षेचे कंत्राट घेणाऱ्या खासगी कंपनीने विद्यापीठाला दिले. मात्र, अद्याप विद्यापीठ किंवा या कंपनीकडून सायबर सेलकडे तक्रार दाखल केली की नाही, याची माहिती प्रशासनाने दिलेली नाही.परीक्षा झालेल्यांची परीक्षा पुन्हा घेऊ नये आणि लवकरात लवकर सदर कंपनीने अधिकृत सायबर गुन्हा दाखल करावा, असे आश्वासन प्रकुलगुरूंकडून युवासेनेने घेतल्याची माहिती सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. तर, पुरवठादार कंपनी अंतिम वर्षाच्या तांत्रिक अडचणी पूर्णपणे सोडवत नाही तोपर्यंत विद्यापीठाने आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात. तसेच लिट्ल मोर इनोव्हेशन लॅब या खाजगी पुरवठादार कंपनीचे आॅनलाइन परीक्षांचे काम थांबवून त्यांना कोणत्याही प्रकारची रक्कम अदा करू नये, अशी मागणी मनविसेचे राज्य उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी केली.
‘आयडॉल’च्या पुढील सर्व परीक्षा १८ ऑक्टोबरपर्यंत झाल्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 3:51 AM