सर्व गणेश भक्त, मंडळांचे पदाधिकारी यांना कळविण्यास येते की...

By सचिन लुंगसे | Published: August 25, 2022 10:17 AM2022-08-25T10:17:22+5:302022-08-25T10:18:15+5:30

महापालिकेच्या गणेशोत्सव माहिती पुस्तिकेत गणेशोत्सवाशी संबंधित माहिती देण्यात आली आहे.

All Ganesha devotees, office bearers of Mandals are informed that... Mumbai | सर्व गणेश भक्त, मंडळांचे पदाधिकारी यांना कळविण्यास येते की...

सर्व गणेश भक्त, मंडळांचे पदाधिकारी यांना कळविण्यास येते की...

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून, देखाव्यासाठीचे मंडप देखील उभे राहिले आहेत. मात्र अद्याप देखील काही ठिकाणी मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी आवश्यक परवानगी मिळविण्यात मंडळांना अडचणी येत आहेत. त्यात महापालिकेकडून मंडळ मंडपाना परवानगी देण्याची अंतिम मुदत २३ ऑगस्ट देण्यात आल्याने यात आणखी अडचणींची भर पडली होती. मात्र आता महापालिकेने यावर तोडगा काढला असून, गणेशोत्सव मंडप परवानगी अर्ज सादर करण्याची मुदत २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे मंडळांना दिलासा मिळाला आहे.

सर्व गणेश भक्त, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि मुंबईकर यांना कळविण्यात येते की, बृहन्मुंबई क्षेत्रात गणेश मंडळ मंडपाना परवानगी देण्याची अंतिम मुदत २३ ऑगस्ट अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र विविध गणेश भक्त व मंडळांनी त्यास मुदतवाढ देण्याची विनंती महानगरपालिका प्रशासनाकडे केली होती. या विनंतीचा मान राखून महानगरपालिका प्रशासनाने गणेशोत्सव मंडप परवानगी अर्ज सादर करण्याची मुदत २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत वाढवली आहे, अशी माहिती उपायुक्त तथा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी दिली.

महापालिकेच्या गणेशोत्सव माहिती पुस्तिकेत गणेशोत्सवाशी संबंधित माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सर्वसाधारण माहिती, मंडप परवानगी अर्जाचा नमुना, विविध मार्गदर्शक सूचना, या संदर्भात निर्गमित केलेले परिपत्रक, महानगरपालिकेच्या उद्यान खात्याचे परिपत्रक, गणेशोत्सवात जाहिराती प्रदर्शित करण्याबाबतचे निकष, महानगरपालिकेचे व इतर महत्त्वाचे नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, नैसर्गिक विसर्जन स्थळांचा विभागवार नकाशा, कृत्रिम विसर्जन तलावांची विभागवार यादी, सण आणि समारंभांसाठी रस्त्यांवर तात्पुरते बांधकाम उभारण्यास परवानगी देण्याबाबतच्या धोरणातील महत्त्वाच्या तरतुदी, मूर्ती विसर्जन दिवशी समुद्राला असलेल्या भरती व ओहोटीच्या वेळा, लाटांची उंची याची माहिती देण्यात आली आहे.

गणेश गौरव पुरस्कार
यंदा दोन वर्षांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेद्वारे श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्जाचा नमुना आणि स्पर्धेचे नियम माहिती पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत.

नियंत्रण कक्ष
महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांच्या कोविड विषयक नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक देखील माहिती पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत.

गणेशोत्सव पर्यावरणपूरक
यंदा हा उत्सव अधिक उत्साहाने साजरा केला जाणार आहे. या उत्सावाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या व वेळोवेळी दिल्या जाणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा.
- मुंबई महापालिका

Web Title: All Ganesha devotees, office bearers of Mandals are informed that... Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.