Join us

सर्व गणेश मूर्तीचे विसर्जन आरे तलावात करणारच; शिवसेनेने आरे सीईओंना ठणकावले 

By मनोहर कुंभेजकर | Published: August 24, 2023 1:42 PM

मुंबई-कायदा सुव्यवस्था न बिघडवता येथे येणाऱ्या घरगुती व सार्वजनिक गणेशा मूर्तींचे विसर्जन आरे तलावातच करणार असे ठामपणे शिवसेनेच्या (उबाटा) ...

मुंबई-कायदा सुव्यवस्था न बिघडवता येथे येणाऱ्या घरगुती व सार्वजनिक गणेशा मूर्तींचे विसर्जन आरे तलावातच करणार असे ठामपणे शिवसेनेच्या (उबाटा) शिष्टमंडळाने आरे दुग्ध वसाहतीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी( (सीईओ)  बाळासाहेब वाकचौरे यांना ठणकावून सांगितले. यावेळी शिवसेनेने आरे तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला मनाईकरणाऱ्या आरे प्रशासनाचा शिवसेनेने जोरदार निषेध केला.

 "मुंबई उपनगर गणेशोत्सव समन्वय समितीचे" सचिव व माजी आमदार डॉ.विनोद घोसाळकर, स्थानिक आमदार समितीचे उपाध्यक्ष सुनिल प्रभु. माजी नगरसेवक व समितीचे कोषाध्यक्ष अशोक पटेल यांच्या शिष्टमंडळाने वाकचौरे यांची त्यांच्या दालनात भेट घेवून त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आणि त्यांना शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी माजी नगरसेवक दिलीप शिंदे. विधानसभा समन्वयक - गोरेगाव विधानसभा समन्वयक दीपक सुर्वे माजी नगरसेविका रेखा रामवंशी, उपविभागप्रमुख सुधाकर (बंड्या) देसाई, लक्ष्मण नेहरकर, शाखाप्रमुख सर्वश्री संदिप गाढवे,बाळा तावडे,संजय जायसवाल,कमलाकर नादोंसकर, दीपक रामाणे,महिला शाखासंघटक अपर्णा परळकर,हर्षदा गावडे,युवासेना समन्वयक .पूजा शिंदे,युवासेना उप अधिकारी वैभव कांबळे, गणेश मुर्तीकार (कार्यशाळेचे- चालक) गोरेगाव (पूर्व) चे गणेशोत्सव मंडळाचे पधाधिकारी उपस्थित होते.

काय आहे आरे प्रशासनाची भूमिका

आरेच्या नैसर्गिक तलावात २०२२ पर्यंत येथे सुरळीत घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन होत होते.मात्र पर्यावरण जलवायू व हवामान बदल विभाग ,भारत सरकार,नवी दिल्ली यांच्या ५ डिसेंबर २०१६ च्या अधिसूचने नुसार आरे दुग्ध वसाहती मधील संपूर्ण परिसर पर्यावरण व संवेदनशील ( इएसझेड) म्हणून घोषित करण्यात आल्याने यंदा आरे तलावात गणेश विसर्जन करता येणार नाही असे पत्र आर दुग्ध वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी( सीईओ) बाळासाहेब वाघचौरे यांनी दि,११ ऑगस्ट रोजी पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांना पाठवले होते.

सदर पत्रामुळे मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कुठलाही पर्याय न देता या घेतलेल्या प्रशासनाच्या  निर्णयावर मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ. विनोद घोसाळकर यांनी आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दि,१७ ऑगस्ट रोजी पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते.

किमान यावर्षी तरी आरे तलावात गणेश विसर्जनाच्या आयोजनाला परवानगी द्यावी

किमान यावर्षी तरी आरे तलावात गणेश विसर्जनाच्या आयोजनाला परवानगी द्यावी असे पालिकेच्या पी दक्षिण विभाग सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी दि,१८ ऑगस्ट रोजी आरे दुग्धवसाहतचे सीईओ बाळासाहेब वाकचौरे यांना पाठवले होते.

आरे तलावात गेली अनेक वर्षे गोरेगाव पूर,मालाड पूर्व,कांदिवली पूर्व तसेच इतर ठिकाणावरून गणेध भक्त आपल्या घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन आरे तलावात करतात.पालिकेच्या उपलब्ध माहिती नुसार गेल्या वर्षी ३१०५ घरगुती आणि ३२६ सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन येथे झाले होते. महानगर पालिकेतर्फे दरवर्षी येथे विसर्जनासाठी आवश्यक त्या सुविधा करण्यात येतात.त्याअनुषंगाने याहीवर्षी आवश्यक त्या सेवा सुविधा पुरवण्याची कार्यवाही सुरू झाली आहे असे पी दक्षिण विभाग सहाय्यक आयुक्तांनी आपल्या पत्रात नमूद केले होते.

टॅग्स :आरे