मुंबई : शरीर पिळदार बनविण्यासाठी तरुणांमध्ये स्टेरॉईड सेवनाचे प्रमाण वाढत असून त्यातून काहींना जीव गमवावा लागत असल्याचे तीव्र पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. पुढच्या सहा महिन्यांत राज्यातील सर्व व्यायामशाळांची तपासणी करण्यात येईल. बंदी घातलेल्या हानीकारक स्टेरॉईडची विक्री करणाऱ्या व्यायामशाळांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अन्न व औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले.जीममध्ये जाऊन वर्षभरात सिक्स पॅक शरीर घडविण्यासाठी तरूण स्टेरॉईड सेवन करतात. ते जीवावरही बेतत आहे. कल्याणमध्ये एका तरूणीचा तर मुंब्रामध्ये एका तरूणाचा यामुळे मृत्यू झाला. याची दखल शासन घेईल, असे शिंगणे म्हणाले.तरुणीने डीनायट्रोफिनॉल हे रसायन असलेली कॅप्सूल सेवन केली. या रसायनावर देशात बंदी आहे. त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आशीष शेलार यांनी केली. यावर बोलताना विधि व न्याय विभागाशी चर्चा करून कायदा आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शिंगणे यांनी सांगितले.
सर्व व्यायामशाळांची सहा महिन्यांत तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 4:49 AM