उत्पादन शुल्काच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वतोपरी मदत - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 06:19 AM2024-02-15T06:19:49+5:302024-02-15T06:20:44+5:30
राज्य उत्पादन शुल्क भवनाचे उद्घाटन
मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. पोलिसांप्रमाणेच उत्पादन शुल्काच्या प्रस्तावित स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रासाठी सरकार मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देण्यात उत्पादन शुल्क विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागाची भव्य वास्तू पालिका मुख्यालयाशेजारी उभारण्यात आली असून, गेल्या काही दिवसांपासून ती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. उद्घाटन सोहळ्याला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार भरतशेठ गोगावले, उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते.
जवानांना स्वतःचे प्रशिक्षण केंद्र नाही
मंत्री शंभूराज देसाई यांनी नवीन कामाचा धावता आढावा घेतला. गेल्या वर्षी २१,५०० कोटीचा महसूल उत्पादन शुल्काने राज्याला मिळवून दिला होता. तर आजघडीला १९ हजार कोटी महसूल जमा आहे. येत्या दोन महिन्यात तो अधिक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय उत्पादन शुल्काचे जवान पोलिसांच्या अकॅडमीत जाऊन सराव करतात. त्यांना स्वतःचे प्रशिक्षण केंद्र नाही. उत्पादन शुल्काचे स्वतःचे प्रशिक्षण केंद्र असावे, यासाठी कोयना बॅक वॉटर परिसरात प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी २०० ते २५९ कोटी निधी आवश्यक आहे. त्यांला मान्यता मिळावी, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.