साकीनाका बलात्कार प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : साकीनाका येथे ३० वर्षीय महिलेवरील बलात्कार प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक रविवारी मुंबई दौऱ्यावर होते. आयोगाच्या अध्यक्ष चंद्रमुखी देवी यांनी पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच याप्रकरणी आवश्यक ती सर्व मदत आयोगाकडून पुरविण्यात येईल, अशा शब्दात आश्वस्त केले.
साकीनाका येथील बलात्कार प्रकरणाचे वृत्त बाहेर येताच राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची स्यु-मोटो दखल घेतली होती. तसेच याप्रकरणी तातडीने एफआयआर दाखल करून आरोपींना ताब्यात घेण्याचे निर्देश राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले होते. रविवारी मुंबई दौऱ्यावर आलेल्या पथकाने पोलीस महासंचालकांची भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतला. आरोपींना तातडीने ताब्यात घेऊन जलदगतीने प्रकरणाचा तपास पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्ष चंद्रमुखी देवी यांनी दिल्या. तसेच पीडितेच्या मुलीला भरपाई देतानाच तिच्या पुनर्वसन आणि शिक्षणाची व्यवस्था करण्याची सूचना दिली.
याशिवाय, आयोगाच्या पथकाने साकीनाका येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच स्थानिक पोलीस स्थानकाला भेट देत या प्रकरणातील प्रगतीबाबत विचारणा केली. त्यानंतर जेथे पीडितेवर उपचार झाले, त्या राजावाडी रुग्णालयाला भेट देऊन संबंधित डाॅक्टरांशी चर्चा केली.