लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी २९ जून रोजी शैक्षणिक शुल्कमाफी संदर्भात घोषित उपाययोजनांनी विद्यार्थ्यांचे समाधान झालेले नाही. ट्यूशन फी सहित सर्व शैक्षणिक शुल्क माफीसाठी तसेच अन्य मागण्यांसाठी सोमवारी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनने आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना काही काळ ताब्यात घेऊन काही वेळाने सुटका करण्यात आली.
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्याध्यक्ष विराज देवांग म्हणाले की, कोरोना काळातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संपूर्ण फी माफीसाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या मार्फत मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेली शैक्षणिक शुल्कात सवलत तोकडी आणि अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाने विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, ओबीसी, एससी, एसटी विद्यार्थ्यांची फडणवीस सरकारच्या काळात रद्द केलेली फ्रीशिप योजना पूर्ववत करावी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा त्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात याव्यात, त्या व्यतिरिक्त कोरोना काळातील शैक्षणिक कर्जाचे हप्ते माफ करण्यात यावे, महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी शैक्षणिक संस्था प्रवेश शुल्क यांचे नियमन कायदा २०१५ यातील विद्यार्थी विरोधी तरतुदी तात्काळ रद्द करत त्यासंबंधी अध्यादेश काढावा, एमपीएससी परीक्षा तात्काळ घेण्यात याव्यात त्यासोबतच विविध भरती प्रक्रिया राज्यात तात्काळ पूर्ववत कराव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता ताब्यात घेऊन डीबी रोड सायबर पोलिस ठाणे येथे ठेवण्यात आले होते. सांयकाळी ५ वाजता या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली.
तर ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्य सचिव प्रशांत आंबी यांनी सांगितले की विद्यार्थी प्रतिनिधींनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु भेट होऊ शकली नाही. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करून विद्यार्थी व पालकांना संघटित करण्याचे प्रयत्न आहेत.