लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लसीकरण पूर्ण झाल्यानंतरही कोरोनाची बाधा झालेले सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे मुंबई पालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यापैकी केवळ पाचजणांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
पालिकेने दक्षिण मुंबईतील ''डी'' विभागात हे सर्वेक्षण केले. मलबार हिल, ग्रँट रोड, अल्टामाउंट रोड, पेडर रोड आणि ताडदेव या प्रभागांचा त्यात समावेश आहे. गेल्या महिन्यात या परिसरात ४६० रुग्ण आढळले. त्यातील १५८ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यापैकी ६० टक्के म्हणजे ९५ जण दुसरा डोस घेतल्यानंतर ९० दिवसांनी कोरोनाबाधित झाले. या रुग्णांपैकी केवळ ५ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. विशेष म्हणजे हे सर्वजण उपचारांनंतर पूर्णपणे बरे झाले. त्यामुळे ऑगस्टमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात शून्य मृत्युदर नोंदविण्यात आला असून, पाचजण वगळता अन्य कोणालाही मोठ्या उपचारांची गरज भासली नसल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.
राज्याच्या कोविड -१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले की, कोरोना विरोधी लढ्यात लस हीच शक्ती असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणाने सिद्ध केले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने लसीकरण पूर्ण करावे, यासाठी आम्ही पुनःपुन्हा आवाहन करीत आहोत. सध्या वापरात असलेल्या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यांचे सुधारित डोसही बाजारात दाखल होतील. त्यामुळे कोरोना विरोधात झुंज देण्यासाठी आपल्याला आणखी बळ मिळणार आहे.
......
नियमपालन यापुढेही आवश्यक!
कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरिकांना संसर्ग झाल्यानंतर कोणत्याही गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले नाही, हे त्या लसींचे यश आहे. फार कमी लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले, मृत्युदर तर शून्य टक्के नोंदविण्यात आला. असे असले तरी दोन डोस घेतल्यानंतर नियम पाळणे सोडून देऊ नका. कोरोना पूर्णपणे हद्दपार होत नाही तोपर्यंत सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. माधव साठे यांनी सांगितले.