मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने महापालिकेने सर्व कोविड काळजी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एका आठवड्याच्या कालावधीत ही केंद्रे सुरू करण्याचे निर्देश मुुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार कोरोना काळजी केंद्रांत ७० हजार ५१८ खाटा उपलब्ध आहेत. यांपैकी सध्या १३ हजार १३६ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत; तर ९७५७ खाटा राखीव आहेत. नोव्हेंबर महिन्यानंतर रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे बहुतांश कोविड काळजी केंद्रे बंद करण्यात आली होती; तर सात जम्बो कोविड केंद्रे आणि प्रत्येक विभागात एक असे एकूण २४ कोविड केंद्रे ३१ मार्च २०२१ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीत काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयातील ३० टक्के खाटांवर सध्या रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे बंद कोविड केंद्रे सुरू करण्याबरोबरच जम्बो केंद्र अनिश्चित कालावधीपर्यंत सुरू ठेवण्यात येतील.
मनुष्यबळाचे नियोजन
बाधित रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल २४ तासांच्या आत महापालिकेला कळविणे, तसेच याबाबतची माहिती संबंधित संकेतस्थळावर तत्काळ अपलोड करणे बंधनकारक आहे. सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या विभागात आवश्यक ते सर्व नियोजन तातडीने करावे. आयसीयू खाटा, ऑक्सिजन खाटा, रुग्णवाहिका, मनुष्यबळ, औषधोपचार, आदी सर्व संबंधित बाबींचे सूक्ष्मस्तरीय नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.