Join us  

हार्बरवर सर्व लोकल बारा डब्याच्या

By admin | Published: August 11, 2016 4:08 AM

मध्य रेल्वे मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवर सर्व लोकल बारा डबा धावत असतानाच हार्बर रेल्वे मात्र यापासून वंचित राहिली होती.

मुंबई : मध्य रेल्वे मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवर सर्व लोकल बारा डबा धावत असतानाच हार्बर रेल्वे मात्र यापासून वंचित राहिली होती. एप्रिल महिन्यात पहिली लोकल धावल्यानंतर हार्बरवर सर्व बारा डबा लोकल कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होता. त्यानंतर नऊ डबावरून बारा डबा लोकल करण्याच्या कामांना वेग देण्यात आला आणि १0 आॅगस्टपासून सर्व लोकल बारा डबा धावू लागल्या. यामुळे हार्बरवरील प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता ३३ टक्क्यांनी वाढणार आहे. हार्बरवर बारा डबा लोकल धावण्याची प्रतीक्षा प्रवाशांना होती. नऊ डबावरून बारा डबा लोकल चालविण्यासाठी हार्बरवरील प्लॅटफॉर्मचे लांबीकरण करण्यावर भर दिला जात होता आणि हे काम एप्रिल महिन्यात पूर्ण करण्यात आले. त्यानंतर डबे उपलब्ध होताच २९ एप्रिल २0१६ रोजी हार्बर मार्गावर पहिली बारा डबा लोकल धावली. हार्बर मार्गावर सध्या ३६ लोकलच्या ५८४ फेऱ्या होतात. या मार्गावरील सर्व फेऱ्या आता बारा डबा असतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. मध्य रेल्वेकडून हार्बरवरील सर्व लोकल बारा डबा जरी करण्यात आले असले तरी सीएसटी ते अंधेरी, बोरीवली मार्गावर धावणारी पश्चिम रेल्वेची एक नऊ डबा लोकल मात्र बारा डबा झालेली नाही. ही लोकल पश्चिम रेल्वेची असल्याने ती बारा डबा करण्याचे काम हे पश्चिम रेल्वेचे असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या सहा फेऱ्या होत असून सीएसटी ते अंधेरी दरम्यान पाच आणि एक फेरी सीएसटी ते बोरीवली दरम्यान होते. 1मध्य रेल्वे मेन लाइन आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सर्व लोकल बारा डबा धावत आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना काही महिलांना बारा डबा लोकलची सवय होती. नऊ डबा लोकल हार्बरवर धावत असल्याने महिला प्रवाशांची धावपळ होत होती. मात्र आता बारा डबा लोकल सुरू झाल्याने ही धावपळ थांबेल. 2हार्बरवर बारा डबा लोकल चालविण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान सीएसटी स्थानकाजवळ ७२ तासांचा ब्लॉकही घेतला. हे काम पूर्ण केल्यानंतर प्रशासनाकडून त्वरित हार्बरवर डीसी ते एसी परिवर्तनही करण्यात आले. हे परिवर्तन पूर्ण होताच बारा डबा लोकल चालविण्यात आली. 3मध्य रेल्वेने हार्बरवर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारा डब्यांच्या २00 फेऱ्या, ३१ मेपर्यंत दहा लोकलचे बारा डब्यात आणि १५ जूनपर्यंत आणखी सहा लोकल बारा डब्यांमध्ये रूपांतरित करण्याचे टार्गेट ठेवले होते. त्यानंतर हेच टार्गेट तांत्रिक कारणास्तव आॅगस्ट महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आले.