सर्व कनिष्ठ न्यायालये ( पुणे वगळले ) १ डिसेंबरपासून पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 06:34 AM2020-11-28T06:34:43+5:302020-11-28T06:35:09+5:30
पहिल्या सत्रात ज्या प्रकरणात पुरावे नोंदवायचे आहेत, अशी प्रकरणे चालविण्यात येतील. तर दुसऱ्या सत्रात निकाल दिले जातील
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुणे वगळता राज्यातील सर्व जिल्हा सत्र न्यायालये आणि न्यायदंडाधिकारी न्यायालये १ डिसेंबरपासून दोन शिफ्टमध्ये सुरू होणार आहेत. यासंदर्भातील नोटीस उच्च न्यायालयाचे महानिबंधक एस.जी. दिघे यांनी काढली. पहिली शिफ्ट सकाळी ११ ते दुपारी १.३० आणि दुसरी शिफ्ट दुपारी २ ते संध्या. ४.३० वाजेपर्यंत असेल.
पहिल्या सत्रात ज्या प्रकरणात पुरावे नोंदवायचे आहेत, अशी प्रकरणे चालविण्यात येतील. तर दुसऱ्या सत्रात निकाल दिले जातील. कोरोनाकाळात राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालये मर्यादित क्षमतेने कामकाज करीत होती. मात्र, १ डिसेंबरपासून सर्व न्यायालये पूर्ण क्षमतेने काम करतील. त्यासाठी न्यायालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
दोन सत्रांत कामकाज
सध्या या न्यायालयांचे कामकाज दोन सत्रांत चालेल. अकारण गर्दी होऊ नये म्हणून दोन्ही सत्रांच्या कामाचे स्वरूप ठरवून दिले आहे.