मुंबई : मुंबईतल्या अनेक गल्ल्या तिकडे मिळणाऱ्या वस्तूंमुळे, पदार्थांमुळे प्रसिद्ध आहेत. उदा. खाऊ गल्ली, मसाला गल्ली, चिवडा गल्ली. याच गल्ल्यांप्रमाणे मरीन लाईन्समधील दवाबाजार. देशभरातल्या सगळ्या ब्रॅण्डेड औषधांसाठी हा दवाबाजार प्रसिद्ध आहे. या दवाबाजारात काय काय मिळतं याची एक सफर करून येऊया. जेणेकरून कधी कोणत्या औषधाची तुम्हाला गरज लागलीच तर इकडे तिकडे भटकण्यापेक्षा थेट दवाबाजारात तुम्ही जाऊ शकता.
मरीन लाईन्स स्थानकावरून सरळ खाली महंमद अली रोडकडे आलात की तिथं लागणारा रस्ता म्हणजे दवाबाजार. सुरुवातीला लागणाऱ्या औषधांच्या दुकानांमध्ये तुम्हाला बेबी क्रीम, बेबी ऑईल, बेबी पावडर, बेबी शॅम्पू, पेट्रोलिअम जेली, अॅसिटोन अशी औषधं मिळतात. या रस्त्यावरच आपल्याला रॉय अॅण्ड कंपनी आणि जॉय फार्मसी यासारख्या होमिओपॅथी ओषधांची जुनी दुकानंदेखील मिळतील. एवढंच नव्हे तर चंदनापासून बनवणारी उत्पादनंही इथं मिळतात. इथून पुढे गेलात की तुम्ही शामलदास गांधी मार्गात येऊन पोहोचाल. या चौकातून तुम्ही मरीन लाईन्सकडे रवाना होऊ शकता. या चौकात पोहोचण्यासाठी तुमच्याकडे मस्जिद बंदर, मरीन आणि सीएसटी असे तीन मार्ग आहेत. या चौकाच्या पुढे गेलात की तुम्ही दवा बाजाराच्या दुसऱ्या टप्प्यात येऊन पोहोचाल. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा तुम्हाला औषधांची दुकानं दिसतील. या रस्त्यावर तुम्हाला होमिओपॅथी, अॅलोपॅथी, आयुर्वेदिक अशी औषधं मिळतील. रुग्णालयाशी संबंधित सगळी वैद्यकीय साधनंही तुम्हाला इथं मिळतील. व्हिल चेअर, हँडिकॅप्स सायकल, टॉयलेट चेअर, मानेचा किंवा कमरेचा पट्टा, स्थेटस्कोप, थर्मामीटर, नीकॅप, वजन काटा, नेब्युलायजर अश्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथं सापडतील. एवढंच नव्हे तर तुम्हाला इथं शस्त्रक्रियेसाठी लागणारी सगळी साहित्यही मिळतील. अगदी हँडग्लोज, इंजेक्शनच्या सुया, स्पेशल बेड, वॉटर बेड अशा गोष्टीही मिळतील. तसंच ज्या रुग्णाला उपचारानंतर घरीच बेडरेस्ट सांगितली असेल त्यांना लागणारी सगळी साहित्य इथं मिळतील.
आणखी वाचा - पुण्यातील स्ट्रीट शॉपिंगसाठी ही ठिकाणं आहेत सर्वात लय भारी
एवढंच नव्हे विज्ञान शाखेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी इथं मिळतात. डिसेक्शन बॉक्स, अवयवांचे सांगाडे, मानवी शरीराचे सापळे, सूक्ष्मदर्शिका, परीक्षानळ्या, चंबू असं सारं काही जे जे प्रयोगशाळेत लागतं ते सारं तुम्हाला इथं मिळेल. एवढंच नव्हे तर विज्ञान शाखेसंबंधित पुस्तकं मिळू शकतात. या रस्त्यावर रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक औषधं घेताना दिसतात. विविध आजारांवर इथं औषधं मिळत असल्याने मुंबईतल्या कानाकोपऱ्यातून लोक इथं औषधाच्या शोधात येत असतात. पण या केमिस्टच्या दुकानांच्या रांगामध्ये एक-दोन अत्तरांची दुकानंही आहेत. त्यामुळे विविध औषधांच्या वासांमध्ये या अत्तरांच्या दुकानातून येणारा सुवास मन अगदी प्रसन्न करतं.