MHADA Exams : "म्हाडाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या"; जितेंद्र आव्हाडांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 09:23 AM2021-12-12T09:23:53+5:302021-12-12T09:42:41+5:30
Jitendra Awhad And MHADA : "म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही."
मुंबई - म्हाडामधील नोकर भरतीसाठी परीक्षा होणार आहेत. यापूर्वी आरोग्य विभागातील भरतीकरिता परीक्षा झाल्या आणि पेपर फुटीचे प्रकरण बाहेर पडले. यावरून वादंग सुरू असताना म्हाडा भरतीमध्ये आर्थिक व्यवहार झाले असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कानावर आल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत आव्हाड यांनी दोषींना सोडले जाणार नाही असा सज्जड दम दिला आहे. त्यानंतर आता म्हाडाच्या (MHADA) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
"काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडा आणि इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहेत. ऐन वेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षा देण्यासाठी सेंटरवर जाऊ नये, गाव सोडू नये" असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती आहे.
म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 11, 2021
उद्या परीक्षा होणार नाही pic.twitter.com/ewR8XrWe0G
"म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे. काही जणांनी आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. असे करून त्यांनी पैसे दलालांना दिले आहेत" असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत"
"माझी या दलालांना नम्र विनंती आहे कि हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांच काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही" असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच "ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत. गरीबाचे शाप घेऊ नका कृपया म्हाडाची नोकरी लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेत त्यांनी उद्या रात्रीपर्यंत ते पैसे परत करावेत. कारण तुमच्या पैशाने हे काम होईल हा जरी तुम्हांला कोणी विश्वास दिला असेल तर ते कदापि शक्य नाही" असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दलाली करणाऱ्यांना दिला आहे.
.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 11, 2021
माझी या दलालांना नम्र विनंती आहे कि हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांच काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. पण असे ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत.