Join us

'युती करायची नसेल तर माझे सर्व उमेदवार तैय्यार', शिवसेनेचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 11:38 AM

29 सप्टेंबर रोजी घटस्थापना आहे. तत्पूर्वीचा पंधरवडा हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो

मुंबई - शिवसेनाभाजपा युतीचा पेच अद्यापही सुटलेला नाही. ‘आमचं सगळ काही ठरलंय’ असा दावा भाजप आणि शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांकडून केला जात असला, तरी युतीच्या घोषणेचा मुहूर्त मात्र पुढेच जात आहे. युतीच्या घोषणेला पितृपक्षाचा आणि संभाव्य बंडखोरीचा अडसर असल्याचे समजते. घटस्थापनेपर्यंत युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ चालणार असे दिसते. मात्र, युतीचा निर्णय लांबणीवर पडत असल्याने शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी भाजपला इशारा दिला आहे.

29 सप्टेंबर रोजी घटस्थापना आहे. तत्पूर्वीचा पंधरवडा हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या काळात कोणत्याही नव्या कार्याची सुरुवात टाळण्याकडे बहुतांश लोकांचा कल असतो. त्यामुळे युतीबाबतचे सोपस्कार आठवड्याभरात पूर्ण करून घटस्थापनेलाच घोषणा केली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, 2014 साली घटस्थापनेच्या दिवशीच युती तुटली होती आणि शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे गेले होते. यावेळी मात्र एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात, अशी युतीच्या नेत्यांची भूमिका आहे. 

शिवसेनेच्या बीडमधील मेळाव्यात बोलताना खैरे यांनी आमचे 288 उमेदवार तयार असल्याचं म्हटलंय. एकदा काय तो युतीचा निर्णय घ्या नाहीतर आमचे उमेदवार स्वबळावर लढणार असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे. ''उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनाने आदित्य साहेबांच्या नेतृत्वात नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे युती करायची तर लवकर करा. मात्र, युतीमधील शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभा करू नका. आम्ही भाजपाच्या जागेच्या विरोधात शिवसेनेचा एकही उमेदवार उभा करणार नाही. पण युती करायची नसेल तर बीडच्या 6 जागांवर माझे उमेदवार तयार आहेत. त्यांनी युती तोडली तर आम्ही तयार आहोत'' असा इशाराच खैरे यांनी भाजपाला दिला आहे.

दरम्यान, जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून, तीन-चार दिवसांत सर्वच बाबी नक्की केल्या जातील. पितृपंधरवडा संपला की, घटस्थापनेचा मुहूर्त साधत युतीची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुहूर्त, पंचांगावर दोन्ही बाजूच्या नेत्यांचा विश्वास आहे. शिवाय, घोषणा करताना संख्याशास्त्राचाही विचार केला जाणार असल्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली. 

टॅग्स :शिवसेनाचंद्रकांत खैरेभाजपाउद्धव ठाकरेविधानसभा निवडणूक 2019