सगळे लाड एक्स्प्रेसचे, लोकलच्या नशिबी वनवास; पश्चिम रेल्वेचा दुजाभाव, प्रवासी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 10:01 AM2023-04-15T10:01:14+5:302023-04-15T10:01:25+5:30
लांबपल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत असल्याने मुंबईतील लोकल सेवांना फटका बसतो.
मुंबई :
लांबपल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत असल्याने मुंबईतील लोकल सेवांना फटका बसतो. लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे चांगले हाल होतात. सकाळाच्या वेळी नोकरदारांना कार्यालयात लेटमार्क लागत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. पश्चिम रेल्वेवर दररोज ३० लाखांहून अधिक जण प्रवास करतात. एसी लोकल वाढविल्यामुळे साध्या लोकलच्या फेऱ्यांत घट झाली असून त्याचा फटका प्रवाशांना बसतो. साध्या लोकलमध्ये गर्दी वाढत असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा अपघाताचा धोका आहे, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
महालक्ष्मी येथे एसी लोकलचे प्रेशर डाऊन
चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या धिम्या एसी लोकलचे महालक्ष्मी येथे प्रेशर डाऊन होऊन जवळपास अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
वायर तुटल्याने वाहतूक ठप्प
पश्चिम रेल्वेच्या दहिसर ते बोरीवली स्थानकादरम्यान अप जलद मार्गांवरील ओव्हर हेड वायर बुधवारी सकाळी तुटल्याने चर्चगेटकडे जाणारी वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी ठप्प झाली होती.
त्यामुळे तब्बल १८ लोकलच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की पश्चिम रेल्वेवर ओढवली. लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. त्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले.
पश्चिम रेल्वे आपल्या वक्तशीरपणासाठी ओळखली जाते, मात्र गेल्या काही महिन्यांत सातत्याने काही ना अपघात घडत आहेत. एसी लोकल वाढविताना साध्या लोकलची संख्या कमी केली जात आहे. तर लांबपल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिल्याने लोकलला विलंब होतो.
- सिद्धेश देसाई, सरचिटणीस,
मुंबई रेल प्रवासी संघ
डहाणू ते चर्चगेट ११ वाजता एक गाडी आहे. त्यानंतर गाडी नाही. सकाळी ७. ०८ ची लोकल कोरोनापासून बंद आहे. लोकलच्या उशिराने लेटमार्क लागतो.
- संतोष भोईर, प्रवासी