Join us

Mumbai Rains: अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, आस्थापने बंद; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन

By ravalnath.patil | Published: September 23, 2020 8:58 AM

मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेने आज नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई व उपनगरात काही ठिकाणी भागांत पाणी साचले आहे. मुंबईत आतापर्यंत 150-200 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे यांसह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेने आज नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. सायन ते कुर्ला, चुनाभट्टी ते कुर्ला या स्थानकादरम्यान पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची अत्यावश्यक सेवेतील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. तर पश्चिम मार्गावरील लोकल वाहतूक चर्चगेट ते अंधेरी दरम्यान ठप्प झाली आहे. तसेच, शहर आणि उपनगरांतील सखल भागांत पाणी साचल्यामुळे बेस्टने अनेक मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवली आहे.

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे व रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पालघरमधील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

 

 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबई