लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तयार आहोत. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जसे विरोधी पक्ष एकत्र आले होते, तसे आता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे मत अखिल भारतीय कुर्मी किसान मजदूर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार बघेल यांनी व्यक्त केले.
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील आणि अखिल भारतीय कुर्मी किसान मजदूर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार बघेल यांच्या मतदाता जनजागृती यात्रेची समाप्ती आज मुंबईमध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बघेल म्हणाले की, ओबीसी एसटी एससी एकत्र घेऊन देश बदलण्यासाठी आम्ही ही यात्रा काढली आणि ती यशस्वी झाली. मोदी हे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नष्ट करत आहे, ते होऊ देणार नाही. आम्ही बुद्धांच्या मार्गाने जाणार आहाेत. केंद्र सरकारचे कायदे शेतकरीविरोधी आहेत. शेतकरी आंदोलन करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तयार आहोत. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जसे विरोधी पक्ष एकत्र आले होते, तसे आता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असेही बघेल या वेळी म्हणाले.
तर, रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे म्हणाले की, छत्तीसगढच्या रायपूर येथून १६ डिसेंबरला त्यांनी ही यात्रा सुरू केली होती. महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांत त्यांनी जनजागृती करून आज मुंबईत या यात्रेचा समारोप करण्यात आला. रिपाइं (ए) तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ते वयाच्या ८५ व्या वर्षीदेखील तरुणांप्रमाणे जनजागृती करत आहेत. रिपाइंचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत उभे राहतील. तसेच रिपाइंच्या कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती केली आहे, त्यांनी आपापली जबाबदारी पार पाडावी. समाजकार्यात स्वतःला झोकून द्यावे. तीन वर्षे चांगले काम करेल, त्याला पुढे संधी दिली जाईल, तर जे काम करणार नाहीत, त्यांच्या जागी दुसऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असे ते म्हणाले.