मुंबई : कोरोना रुग्णांचे आकडा वाढले की भीती वाढते. मग आपण पुन्हा लॉकडाऊनवर येतो. लसीकरण वेगाने होत आहे. आपण मास्क घातले, अंतर पाळले, नियम पाळले तर फरक पडेल. परिस्थिती बिकट आहे. आपण आता नियम पाळले तर भविष्य नीट होईल. कारण हे युद्ध अदृश्य दुश्मनासोबत लढतो आहे.
आपली एक चूक भारी पडू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगावी लागणार आहे. आपल्या सर्वांचे डोळे आता उघडले आहेत. आता आपण आरोग्याच्या बजेटवर मोठे लक्ष देत आहोत. पहिल्यांदा आपण या आरोग्य सेक्टरला मोठे महत्त्व देत असून, सरकारी तिजोरीवर ताण असला तरी आपली प्राथमिकता आरोग्य क्षेत्र आहे, असे पर्यावरण तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट टाळण्यासाठीच्या उपयांचा आढावा ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या मुंबईच्या टर्निंग द टाईड : इज मुंबई रेडी फॉर द नेक्स्ट वेव्ह? या अहवालात घेण्यात आला असून, या अहवालाचे प्रकाशन आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन करण्यात आले. तेव्हा ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, कोरोनाची लाट संपली का ? यावर आपण आता बोलणे उचित होणार नाही किंवा आपण तसे आता सांगू शकत नाही. मात्र, आपण लागू केलेल्या निर्बंधांमुळे लाट कमी होऊ शकली. परंतु आता संभाव्य तिसरी लाट कधी येईल, कशी येईल, तिचा परिणाम कसा असेल, कोणत्या वयोगटाला त्याचा फटका बसेल ? यावर विचार होणे गरजेचे आहे. त्यावर आपण अभ्यास करीत आहोत. बहुतांश ठिकाणी लसीकरण वेगाने सुरू आहे. मात्र, काळजीपूर्वक पुढची पावले टाकणे महत्त्वाचे आहे. लोकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करायचा असेल तर काळजी घेत पुढे चालणे महत्त्वाचे आहे.
मुंबई आणि दिल्लीचा फरक बघितला तर दिल्लीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढलादेखील लवकर आणि कमीदेखील लवकर झाला. मुंबईत तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आपण खाटांची संख्या वाढवीत आहोत. रुग्णालयांची क्षमता वाढवीत आहोत. लसीकरण सुरू आहे. आपण पारदर्शकपणे काम करीत आहोत. सत्य परिस्थिती लोकांसमोर आहे. लसीकरण आपण वेगाने करीत आहोत. आपण प्रतिदिन पंधरा लाख क्षमतेने लसीकरण करीत आहोत. लस उपलब्ध होत आहे त्याप्रमाणे लसीकरण करीत आहोत. देशपातळीवर स्थलांतरित कामगारांचा विचार होणे गरजेचे आहे. कारण कामगार सातत्याने स्थलांतरित होत असतात. हे काम कोणत्या पद्धतीने करतात, कसे काम करतात, सुरक्षा आहे की नाही, कामगार कायदे लागू आहेत की नाहीत, याचा मोठा विचार झाला पाहिजे. सुरुवातीच्या काळात आपण स्थलांतरित कामगारांसाठी काम केले. आता आपण स्थलांतरित कामगारांच्या लसीकरणावर जोर द्यायला हवा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.