लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असतानाच, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात गुरुवारी रात्री ‘ऑल ऑउट ऑपरेशन’ राबविले. त्यात पोलिसांनी १७८ ठिकाणी नाकाबंदी करून ८६९० दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी केली. तर, २२३ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवले.
पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे प्रमुख सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वात ९३ पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.
थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरातील चाैपाट्या, बाजारपेठा, माॅल्स, मंदिरे अशा गर्दीच्या ठिकाणांवर अनुचित घटना घडून नयेत, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ऑल आउट ऑपरेशनदरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने ८७२ हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणी केली. तसेच, ५५५ संवेदनशील ठिकाणांची तपासणी केली.
चालकांवर कारवाई
शहरात १७८ ठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांनी २ हजार ३०० वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली. ६० वाहन चालकांवर ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली.
मुंबईकरांनी ३१ डिसेंबरचा दिवस आनंदाने साजरा करावा, परंतु कुठलाही गैरप्रकार घडल्यास, आम्ही कारवाई करण्यास सज्ज आहोत. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. रेव्ह पार्ट्यांना आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. चौकशीसाठी जागोजागी ‘’चेकपॉइंट्स’’ लावण्यात आले आहेत. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी मद्यपान करून वाहन चालवू नये. सर्व पोलिस जवान सुट्टी न घेता, साजरा न करता, मुंबईकरांच्या सेवेत तैनात असतील. - विवेक फणसळकर, आयुक्त, मुंबई पोलिस
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"