मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र सध्या ‘थांबा आणि वाट पाहा’ची भूमिका स्वीकारली आहे. खुर्चीसाठी प्रमुख पक्ष भिकेचा कटोरा घेऊन एकमेकांच्या मागे धावत आहेत, अशा शब्दांत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सध्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.मनसेने निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली होती. सक्षम विरोधकांसाठी मते देण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज यांनी केले होते. मनसेचा एकमेव आमदार निवडून आला असला तरी मनसेने अद्याप कोणाला पाठिंबा देणार हे स्पष्ट केलेले नाही. स्वत: राज ठाकरे योग्य वेळी याबाबत निर्णय घेणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, काळाच महिमा अगाध आहे. ज्या भाजपने शिवसेनेचा सातत्याने अपमान केला त्यांच्या पाठी पाठी फिरावे लागत आहे, तर ज्या शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली आज त्यांच्याच दरवाजात जाऊन भीक मागत आहे, अशा शब्दांत सध्याच्या पेचप्रसंगावर देशपांडे यांनी भाष्य केले आहे.
सत्तेसाठी सर्वच पक्ष एकमेकांच्या मागे; मनसेचे थांबा आणि वाट पाहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:09 AM