Join us

आरक्षणाच्या भीतीने सर्वपक्षीय नगरसेवक धास्तावले

By admin | Published: March 28, 2015 10:36 PM

आरक्षण सोडतीमध्ये आपला प्रभाग दुसऱ्या प्रवर्गासाठी आरक्षित तर झाला नाही ना अशा चिंतेने अनेक नगरसेवकांना ग्रासले आहे.

वसई : आरक्षण सोडतीमध्ये आपला प्रभाग दुसऱ्या प्रवर्गासाठी आरक्षित तर झाला नाही ना अशा चिंतेने अनेक नगरसेवकांना ग्रासले आहे. महिला आरक्षण असल्यास आपल्या पत्नीला तिकीट मिळावे यासाठी नगरसेवकांनी तयारी चालवली आहे. येत्या सोमवारी ही आरक्षण सोडत होणार असून सर्वच नगरसेवकांमध्ये धाकधूक आहे.वसई विरार शहर महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक लवकरच होणार आहे. त्याकरीता निवडणूक यंत्रणेने जोरदार तयारी चालवली आहे. प्रभागरचना, आरक्षण सोडत हे कार्यक्रम ३० मार्च व १ एप्रिल दरम्यान पार पडणार आहेत. यंदा ११५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये ७८ जागांवर आरक्षण होणार असून ३७ जागा सर्वसाधारण गटासाठी राहणार आहेत. त्यामुळे अनेक नगरसेवकांना घरी बसावे लागणार आहे. हे नगरसेवक आपल्याला आरक्षणामुळे उमेदवारी न मिळाल्यास आपल्या पत्नीला ती मिळावी याकरीता जोरदार तयारी करीत आहेत. तसेच प्रभागरचनेमध्ये आपल्या प्रभागातील कोणता भाग इतर प्रभागांना जोडण्यात आला आहे याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदा २६ प्रभाग वाढल्यामुळे पुर्वीच्या ८९ प्रभागापैकी अनेक प्रभागातील भाग एकत्र करून हे प्रभाग निर्माण करण्यात येणार आहेत. प्रभाग वाढल्यामुळे पुर्वीच्या मतदारसंघातील मतदारांची संख्याही कमी होण्याची शक्यता आहे. यंदा बहुजन विकास आघाडी जुन्या व ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी युवक व युवतींना प्राधान्य देण्याची शक्यता आहे. ५० टक्के महिला आरक्षणामुळे सर्वच राजकीय पक्षांसमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात महीला उमेदवार कशा उभ्या करायच्या असा प्रश्न उभा ठाकला आहे. बहुजन विकास आघाडी व सेनेकडे महिला उमेदवारांची कमतरता नाही परंतु भाजपची अवस्था मात्र अत्यंत बिकट आहे. महिला उमेदवार उभे करताना भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची कसोटी लागणार आहे. यंदा जातपडताळणीचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागास प्रवर्ग या ३ प्रवर्गाच्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. पुर्वी जातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी उमेदवारांची प्रचंड धावपळ होत असे यंदा या कामातुन त्यांना सवड मिळाली आहे. पडताळणीसाठी कोकण आयुक्तालय कार्यालय गाठावे लागत असे परंतु आता हा द्राविडी प्राणायम कार्यक्रम थांबला आहे.या निवडणुकीत राजकीय पक्षासमवेत काही सामाजिक संघटनाही उतरण्याची शक्यता आहे. आगरी सेनेने यापुर्वीच या निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.