Join us

महापालिकेविरोधात मंगळवारी सर्वपक्षीय मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 6:21 AM

बेपत्ता दिव्यांशप्रकरणी हलगर्जीपणास करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी १६ जुलै रोजी पी दक्षिण वॉर्डवर धडक मोर्चा काढण्यात येणार

मुंबई : बेपत्ता दिव्यांशप्रकरणी हलगर्जीपणास करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी १६ जुलै रोजी पी दक्षिण वॉर्डवर धडक मोर्चा काढण्यात येणार असून, यात मनसेसह इतर राजकीय पक्ष सहभागी होणार आहेत. सकाळी १०:३० वाजता मोर्चा काढण्यात येणार असून, गोरेगाव पश्चिम एमजी रोडवरील मनसे मध्यवर्ती कार्यालय ते एस.व्ही.रोड ते पी दक्षिण वॉर्ड कार्यालय असा हा मोर्चा असेल.गोरेगाव येथील आंबेडकर चौक येथून १० जुुलैच्या रात्री दिव्यांश सिंह हा दीड वर्षांचा मुलगा गटारात पडला. त्याचा अद्याप शोध लागला नसून, महानगर पालिकेच्या या हलगर्जीपणास पी/दक्षिण वॉर्डचे सहायक पालिका आयुक्त आणि परिरक्षण विभाग व संबंधित अधिकारी कारणीभूत आहेत, असा आरोप गोरेगाव विधानसभा अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांनी केला आहे. त्यामुळे पी दक्षिण वॉर्डच्या सहायक पालिका व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी आदी विविध राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विधानसभातर्फे दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांची भेट घेऊन दिव्यांश सिंह याच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.>गटारावरचे झाकण काढले कोणी?दिव्यांश ज्या गटारात पडला; त्या आंबेडकर चौकातील गटारावरचे झाकण नक्की कोणी काढले, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. दिव्यांश ज्या परिसरातील गटारात पडला; त्या परिसरात पावसाचे पाणी साचले होते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी दुर्घटनाग्रस्त गटारावरील झाकण काढण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे हे झाकण काढण्यात आल्यानंतर ते बसविण्यासाठी महापालिकेला १९१६ या क्रमांकावर कॉल करणे गरजेचे होते. किंवा पाणी वाहून जाण्यासाठी काढण्यात आलेले झाकण पाणी वाहून गेल्यानंतर पुन्हा बसविणे गरजेचे होते. ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या छायाचित्रांसह व्हिडीओमध्ये गटारावर झाकण असल्याचे आणि ते काढण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असून, अशी कृत्ये करण्यात येऊ नयेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका